बचत गटांसाठी जांभीळघर बनणार ‘अंड्यांचे गाव’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 02:02 AM2019-10-05T02:02:25+5:302019-10-05T02:02:37+5:30
ग्रामीण जनता व तेथील सक्रिय महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
- सुरेश लोखंडे
ठाणे : ग्रामीण जनता व तेथील सक्रिय महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यानुसार, जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून ‘एक गाव अंड्यांचे’ हा नावीण्यपूर्ण उपक्रम अंबरनाथ तालुक्यातील जांभीळघर येथे राबवण्यात येत आहे. येथील २८ गावकऱ्यांना ‘कावेरी’ जातीच्या कोंबड्या दिल्या जात आहेत. त्यापासून मिळणाºया अंड्यांच्या १५ प्रकारच्या रेसिपींद्वारे बचत गटांनादेखील त्यातून रोजगार देण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी नियोजन केले आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणात ‘एक गाव अंड्यांचे’ या उपक्रमासाठी जांभीळघर या गावाची निवड झाली आहे. ‘कावेरी’ जातीच्या कोंबड्यांची खरेदी झाली आहे. प्रत्येकास सुमारे ५० ‘तलंगा’ म्हणजे प्रथमच अंडी देणाºया कोंबड्यांचे वाटप या आॅक्टोबरअखेर होणार आहे.
यासाठी सुमारे चार महिन्यांच्या या कोंबड्यांची (तलंगा) खरेदी झाली आहे. या कोंबड्या सतत ७२ आठवडे म्हणजे दीड वर्षे अंडी देणार आहेत. या दृष्टीने त्यांची काळजी घेण्यात आली आहे.
रोगापासून बचाव करण्यासाठी या चार महिन्यांच्या कोंबड्यांना मानमोडी, देवी आदी रोगांपासून बचाव करणारे लसीकरणदेखील पूर्ण झाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण पवार यांनी लोकमतला सांगितले.
१४०० कोंबड्यांचे वाटप करणार
जांभीळघरच्या या सर्व २८ लाभार्थ्यांकडे तब्बल एक हजार ४०० ‘कावेरी’ जातीच्या कोंबड्या उपलब्ध होणार आहेत. यापासून मिळणाºया अंड्यांच्या विक्रीसाठी मार्केटचे महत्त्वपूर्ण कामदेखील जिल्हा परिषदेने केले आहे. महिला व बालविकास विभाग सहा रुपये दराने या अंड्यांची खरेदी करणार आहे.
यामुळे लाभार्थ्यांना बाजारपेठदेखील उपलब्ध करून दिली आहे. अंड्यांच्या या होलसेल विक्रीनंतरही शिल्लक राहणाºया अंड्यांची सामान्य ग्राहकांना विक्री व्हावी, यासाठी अंबरनाथ येथील रस्तेच्या कडेला एक मोठे विक्री केंद्र उभारले जात आहे. याशिवाय, या गावातील व परिसरातील महिला बचत गटांना अंड्यांपासून तयार होणाºया विविध खाद्यपदार्थांच्या सुमारे १५ रेसिपींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या गावठी अंड्यांच्या १५ रेसिपी खवय्यांसाठी महिला बचत गटांकडून उपलब्ध होणार आहे. खवय्यांच्या पसंतीच्या या पदार्थांना तयार करण्यासाठी लागणारे विविध स्वरूपांचे भांडे, पोशाख, विक्री केंद्रासाठी लागणारी टपरी जिल्हा ग्रामीण विकास विभागाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
बचत गटांना प्रशिक्षण
या सर्व लाभार्थ्यांसह महिला बचत गटांना खास प्रशिक्षण जांभीळघर येथील समाजमंदिरमध्ये नुकतेच पार पडले. यावेळी मुंबईच्या गोरेगाव येथील प्रादेशिक पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. नरेश बांगर यांनी विविध स्वरूपांचे धडे या कार्यशाळेत दिले. या लाभार्थ्यांकडे कोंबड्या पाळण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचीदेखील प्रत्यक्ष पाहणीही झाली आहे. या लाभार्थ्यांसाठी लागणाºया या कोंबड्या १३ आॅक्टोबरला चार महिन्यांच्या होत आहेत.
लाभार्थ्यांस ७५,५०० रुपयांचे अनुदान
या कोंबड्या अल्पावधीतच अंडी घालणार असल्याचे डॉ. पवार यांनी निदर्शनात आणून दिले आहे. या कावेरी जातीच्या कोंबड्या गावठी आहेत. त्या खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पासाठीप्रत्येकास ७५ हजार ५०० रुपये खर्च येत आहे. यातील ७१ हजार ७२५ रुपये लाभार्थ्यास अनुदान म्हणून डीबीटीद्वारे दिले जात आहे. तर, उर्वरित पाच टक्के हिस्सा म्हणजे तीन हजार ७७५ रुपये लाभार्थ्यांस स्वत: भरावे लागत आहेत.