बदलापुरात दहा हेक्टरमध्ये उभारणार ‘जांभूळ वन’, वन विभागाचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:33 PM2023-01-04T13:33:04+5:302023-01-04T13:33:19+5:30
बदलापूर शहर आणि आसपासच्या गावात मिळणाऱ्या जांभळाच्या जातीचे पाच प्रकार भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात पाठविले होते.
बदलापूर : बदलापुरातील जांभळाची गोडी हे सर्वज्ञात असतानाच आता या जांभळाला सर्वोत्कृष्ट जांभळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या अहवालानुसार बदलापूरच्या जांभळात अँथोसायनीन आणि ॲन्टिऑक्सिडंट आढळून आले आहेत. त्यामुळे हे जांभूळ गुणवत्तापूर्ण मानले जात आहे. बदलापुरात जांभळाची गोडी वाढावी यासाठी आता वन विभागानेही जांभूळ वन उभारण्यासाठी दहा हेक्टर जागेची मागणी करणारा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे केला आहे.
बदलापूर शहर आणि आसपासच्या गावात मिळणाऱ्या जांभळाच्या जातीचे पाच प्रकार भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात पाठविले होते. केंद्राच्या अन्न तंत्रज्ञान विभागात या जांभळाच्या दर्जाची तपासणी करण्यात आली. यात गरवी प्रकरातील जांभूळ मांजर्ली, वालिवली, बोराडपाडा आणि कोंडेश्वर परिसरातून संकलित केले होते. या जांभळाच्या भौतिक, जैव रसायन आणि ॲन्टिऑक्सिडंट अशा तीन पातळ्यांवर त्याची तपासणी केली होती. शहरातील कमी होत चाललेल्या या बदलापूरच्या जांभळाला जुने स्थान मिळवून देण्यासाठी जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राची मदत घेतली जात आहे. बदलापूर आणि आसपासच्या भागात एक हजार २५० झाडे आहेत. पर्यावरणप्रेमींनी सुमारे दोन हजार रोपे तयार केली असून लागवडीसाठी तयारी सुरू आहे.
जांभळाची बाजारपेठ तयार करण्याचे प्रयत्न
बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात जांभळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊन बदलापूरला जांभळाची बाजारपेठ तयार करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तसेच जांभळाचा बदलापूर ब्रँड तयार करण्याचा प्रयत्नही सुरू आहे.
‘जांभूळ वन’ उभारण्याचे प्रयत्न
जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट यांच्या पुढाकाराने आणि वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली बदलापुरात दहा हेक्टर जागेवर जांभूळ वन उभारण्याचा प्रस्ताव आहे. वन विभागामार्फत जागेचा शोध सुरू आहे.
बदलापूरच्या जांभळामध्ये ‘अँथोसायनीन’चे प्रमाण अधिक आहे. यामुळे जांभळाचा रंग अधिक गडद असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. सोबतच या जांभळाच्या प्रजातींमध्ये ॲन्टिऑक्सिडंटही असल्याचे नमूद केले आहे.
- आदित्य गोळे, अध्यक्ष, जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट