प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता लढले पाहिजे’ – जमीलाबहन यांचे ईद दीपावली संमेलनात प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:09 PM2019-11-11T17:09:50+5:302019-11-11T17:17:14+5:30
प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता लढले पाहिजे’ असे जमीलाबहन यांनी ईद दीपावली संमेलनात प्रतिपादन केले.
ठाणे : ‘परिस्थिति कितीही कठीण आणि कठोर असली तरी न डगमगता, सत्याची कास धरत तिच्याशी दोन हात करत आपली स्वप्ने पूर्ण करणं, हे सर्वांचे ध्येय असले पाहिजे. तुम्हा मुलांनी आपल्या परिस्थितीसमोर गुडघे न टेकता, समविचारी मित्रांच्या, संस्थेच्या साथीने स्वतःची ताकद ओळखून स्वतःचे आयुष्य साकारले पाहिजे!’ असे प्रतिपादन ‘घर बचाओ घर बनाओ’ आंदोलनात मेधा पाटकरांबरोबर सक्रीय असणार्या आणि विविध जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या सह संयोजक जमीला बेगम इताकुला यांनी केले.
समता विचार प्रसारक संस्थेच्या ईद दीपावली संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. संस्थेच्या उपाध्यक्ष मनीषा जोशी अध्यक्षस्थानी होत्या. घरगुती अत्याचार आणि सामाजिक अन्याय यांना न डगमगता समर्थपणे तोंड देत जमीला बहन यांनी स्वतःचे यशस्वी विश्व उभे केले. स्वतःसाठी आवाज उठवताना त्या आजूबाजूच्या शोषित वंचितांचाही आवाज झाल्या. त्यांचा हा विलक्षण प्रवास एकलव्य मुलांसाठी खूपच प्रेरणादायी होता. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही समता विचार प्रसारक संस्थेचे वार्षिक ईद दीपावली स्नेह संमेलन जोशात साजरे झाले. ईद आणि दिवाळी या सणांचे औचित्य साधून संस्थेच्या एकलव्य विद्यार्थ्यांना गायन, नृत्य, नाट्य आदि कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी या हेतूने हे स्नेह संमेलन आयोजित करण्यात येते. त्याच प्रमाणे संस्थेतर्फे दर वर्षी साथी हिरजी गोहिल एकलव्य क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ, कॅरम या स्पर्धांमध्ये ठाण्यातील विविध वस्तीतील एकलव्य विद्यार्थी उत्साहाने भाग घेतात. तसेच चित्रकला, रांगोळी आणि नृत्याच्या स्पर्धाही घेण्यात येतात. या वर्षी सुद्धा १०० च्या आसपास एकलव्यांनी विविध खेळात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेवून संमेलनात रंगत आणली. या स्पर्धांचे बक्षीस वितरण लक्ष्मी हिरजी गोहिल यांच्या हस्ते संपन्न झाले. कळव्याच्या महापालिका माध्यमिक शाळेतील १० वीच्या वर्गाच्या ‘आम्ही बंजारा’ संघाने क्रिकेटमध्ये बाजी मारली तर त्याच शाळेतील १० वीच्या मुलांचा दूसरा ‘ओम साई’ संघ उपविजेता ठरला. कब्बडीमद्धे कळव्याच्या महापालिका माध्यमिक शाळेतील १० वीच्या वर्गाच ‘जय साई’ गत विजेता तर मानपाड्याच्या माध्यमिक शाळेच्या १० वीच्या विद्यार्थ्यांचा ‘साई रत्न’ गट उपविजेता ठरला. बुद्धिबळमद्धे दुर्वेश भोईर सर्व प्रथम आला. मुलींच्या कॅरम स्पर्धेत किर्ती निकाळजे पहिली आली तर मुलांमध्ये इनोक कोलियार प्रथम आला. चित्रकलेमद्धे एंजेल खैरालिया हिने पहिला नंबर पटकावला, तर रांगोळी स्पर्धेत मनीषा सांबारे व संगीता पवार प्रथम आल्या. श्रुति केदारे, कुमकुम राठोड, आरती पवार आदि मुलींनी नृत्य सादर केली. वंचितांच्या रंगमंचामधील रमाबाई आंबेडकर नगरातील मुलांनी ‘आम्हाला पण नाटक करायचंय’ ही नाटिका सादर केली. अक्षता दंडवते या एकलव्य मुलीने सूत्र संचालन केले. या उपक्रमाचे संयोजन संस्थेचा एकलव्य कार्यकर्ता अजय भोसले याने समर्थपणे सांभाळले. संस्थेचे अन्य कार्यकर्ते लतिका सू.मो., मीनल उत्तुरकर, जगदीश खैरालिया, अनुजा लोहार, सुनील दिवेकर, राहुल सोनार, प्रवीण खैरालिया, इनोक कोलियार आदींनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यास खूप मेहनत घेतली असे संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी आवर्जून संगितले.