जामसरचा हेरिटेज तलाव वेटलॅण्ड घाेषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:16 AM2020-11-16T00:16:09+5:302020-11-16T00:16:17+5:30
केंद्र शासनाने वेटलॅण्ड अधिनियम केल्यानंतर पालघर जिल्ह्यातील ८७ वेटलॅण्डसंदर्भात माहिती मुंबई उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आली होती.
हुसेन मेमन
n लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या जामसर गावाने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या हेरिटेज तलावाला पाणथळ जागा म्हणून घोषित करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला आहे. यासंबंधीचा पाणथळ व जैवविविधता संरक्षण, संवर्धनाबाबत शाश्वत विकास आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
केंद्र शासनाने वेटलॅण्ड अधिनियम केल्यानंतर पालघर जिल्ह्यातील ८७ वेटलॅण्डसंदर्भात माहिती मुंबई उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आली होती. त्यामध्ये जामसर तलावाचा समावेश होता. जामसर तलावाचा उल्लेख नॅशनल वेटलॅण्ड ॲटलासमध्येही असून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ५१ तसेच ४८ नुसार प्रत्येक नागरिकाचे तसेच शासनाचे निसर्गसंवर्धन करणे, हे प्राथमिक व मूलभूत कर्तव्य असल्याने ग्रामस्थांनी हा तलाव वेटलॅण्ड म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक ठराव ऑक्टोबरमध्ये घेतला.
गावातील जैवविविधता, प्राचीन स्थळांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने जामसर पाणथळ आणि जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला सल्ला देण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याचेही ठरवले आहे. असा निर्णय घेणारी जामसर ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बफर झाेनमध्ये
५९ वनस्पती
जामसर तलावाच्या बफर झोनमध्ये ५९ वनस्पतींचे अस्तित्व आढळले आहे. त्यापैकी १० दुर्मीळ, दोन अतिदुर्मीळ व एक असुरक्षित प्रजाती आहे. त्यांचे जतन करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातील पुरातत्त्व विभागातील दोन अभ्यासकांनी जामसर वेटलॅण्डजवळ पुरातत्त्वीय संशाेधन केले असता तेथे ११४ कलाकृती सापडल्या आहेत. तसेच तलावाजवळ एक मोठा पुराणकालीन रस्ता सापडला असून व्यापारासाठी या मार्गाचा वापर होत असावा. त्यामुळे हे स्थळ पर्यटन व अध्ययन क्षेत्र घाेषित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.