जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने मातृभाषेसोबत झाला स्त्रीत्वाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 02:45 PM2019-02-28T14:45:17+5:302019-02-28T14:46:29+5:30

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने मातृभाषेसोबत स्त्रीत्वाचा जागर झाला. 

Jargon of womanhood is associated with mother tongue, on the occasion of World Marathi Language Day | जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने मातृभाषेसोबत झाला स्त्रीत्वाचा जागर

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने मातृभाषेसोबत झाला स्त्रीत्वाचा जागर

Next
ठळक मुद्देमराठी भाषा दिनानिमित्ताने मातृभाषेसोबत स्त्रीत्वाचा जागरविमुक्ता : मराठी कवितेतली ती, तिच्या कवितामाझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा ही कविता सादर

ठाणे : भाषा हा शब्द स्त्रीलिंगी तसेच भाषेला आपण मातृभाषा असं संबोधतो कारण आईकडून पोटात असल्यापासून ती आपल्या कानावर पडत असते. त्यामुळेच आज या मराठी भाषा दिनानिमित्त एक आगळावेगळा प्रयोग आम्ही करायचा ठरवलंय तो म्हणजे विमुक्ता : मराठी कवितेतली ती, तिच्या कविता असं प्रतिपादन केलं कवी गीतेश शिंदे यांनी.

         जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे आयोजित विमुक्ता या कार्यक्रमातून सायली देसाई, मीनल दातार, समर्थ म्हात्रे, गीतेश शिंदे यांनी सुरुवातीला कविवर्य कुसुमाग्रजांच्या माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा ही कविता सादर करत त्यांना अभिवादन केले. त्यानंतर ज्येष्ठ तसेच समकालानी कवयित्री, कविंनी मराठी कवितेत लिहिलेली तिची रूपं, तिचं दु:खं, तिनेच तिच्या अस्तित्वाबद्दल विचारलेले प्रश्न, कवितेतूनच शोधलेली उत्तरं याचा एकत्रित कोलाज या चाैघांनी सादर केला. सायली देसाई, मीनल दातार यांनी विंदा करंदीकरांचे भारतीय स्त्रियांचे स्थानगीत तसेच माय म्हनता म्हनता होट होटालागे भिडे ही बहिणाबाईंची उच्चारशास्त्राची आपल्या नात्यांशी असलेली सांगड साधणारी, अनुपमा उजगरेंची लक्षात ठेव बाई माझे कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. गीतेश शिंदे यांनी कवी प्रशांत असनारेंची पिंजरा, अजय कांडर यांची बाया पाण्याशीच बोलतात, अशोक कोतवालांची मुलीची जात या कविता सादर करत स्त्रीत्वाचे विविध पदर उलगडले. तर समर्थ म्हात्रेंनी संजय चाैधरींची प्लेसमेंट, दासू वैद्य यांची मुलगी आता मोठी झालीय, पु.शि.रेगेंची स्त्री या कविता सादर करून बाईकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोण अधोरेखित केला. मीनल दातार ह्यांनी सादर केलेल्या नीरजा यांच्या महिला स्पेशल, कल्पना दूधाळ यांच्या अधांतरी तसेच सायली देसाई यांनी सादर केलेल्या हर्षदा साैरभ यांच्या कपडे वाळत घालण्याच्या बाईच्या व्यवस्थापनाची, अरुणा ढेरेंची जनी ह्या कविता अंतर्मुख करून गेल्या. किरण येलेंच्या सुरमई कवितेने तसेच आणखी इतर कवितांनी उपस्थितांना विचार करण्यास प्रवृत्त केले. सदर कार्यक्रमाची संकल्पना, संहिता लेखन, दिग्दर्शन गीतेश शिंदे यांचे होते. तत्पूर्वी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे विश्वस्त दा.कृ.सोमण यांनी मराठी बोलण्याची सुरुवात घरापासून केली नाही तर काही वर्षांनी अमेरिकेतील शिक्षण केंद्रात मराठी शिकण्यास जावं लागेल असं उपरोधाने म्हटले. तर अध्यक्ष विद्याधर वालावलकरांनी  आपल्या रोजच्या वापरातून नामशेष होणा-या म्हणींकडे लक्ष वेधले. ह्या प्रसंगी बहिणाबाई चाैधरी विद्यापीठातील दीनदयाळ उपाध्याय अधीन्यास केंद्रात अरुण करमरकरांची निवड झाल्याबद्दल सोमण यांच्या हस्ते, विद्याधर ठाणेकर, वालावलकरांच्या उपस्थितीत अरुण करमरकरांचा शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. या सत्राचे सूत्रसंचालन अनिल ठाणेकरांनी केले. 

Web Title: Jargon of womanhood is associated with mother tongue, on the occasion of World Marathi Language Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.