जव्हार प्रतिष्ठानचा सर्वपक्षीयांना दे धक्का!
By admin | Published: May 27, 2017 02:05 AM2017-05-27T02:05:15+5:302017-05-27T02:05:15+5:30
येथील नगरपरिषदेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सुरु होऊन अवघ्या तासाभरात बुध निहाय निकाल जाहिर झाला
हुसेन मेमन।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : येथील नगरपरिषदेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सुरु होऊन अवघ्या तासाभरात बुध निहाय निकाल जाहिर झाला. यात भरत पाटील प्रणित जव्हार प्रतिष्ठान ने जव्हार मधील सर्वपक्षियांना धक्का देत चारही जागांवर सरशी मिळवली.
आदिवासी भवन येथे ही मत मोजणी पार पडली. पवनीत कौर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. या निकालामुळे जव्हारच्या राजकारणाला कलाटणी मिळाली असून सर्व पक्षियांना जनतेने जागा दाखवली असल्याचे बोलले जात आहे.
प्रभाग क्र. १ मधून अशोक गावंड यांनी बंडखोरी करून स्वबळावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व स्वबळावर ४२४ मते मिळविली असून अवघ्या १६४ मतांनी त्यांचा पराभव झाल्यामुळे एका जागेवर सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार राजेश रजपुत यांनी विजय मिळविला आहे. मात्र, प्रतिष्ठानच्या या विजयाने सगळ्यांनाच धक्का दिला असून यापुढे नगरपरिषदेची होणारी मुख्य निवडणूकीतही जव्हारमधील सर्व पक्षाना तगडे आव्हान निर्माण झाले आहे.
पाच जागांवरील उमेदवार अपात्र ठरल्यानंतर या जागांसाठी जव्हारची पोटनिवडणुक झाली मात्र सुरवातीला ही निवडणूकच नको कारण अवघ्या काही महीन्यांवर मुख्य निवडणूक होणार असल्याचे सर्वपक्षीयानी बहीष्काराची भूमिका घेतली होती. मात्र जव्हार प्रतिष्ठानने ही निवडणूक लढण्याचे जाहिर केल्यानंतर याला शह देण्यासाठी कोणत्याही पक्षाचे चिन्ह न वापरता आपलेच उमेदवार अपक्ष म्हणून उतरवून प्रतिष्ठानला शह देण्याचे काम केले. मात्र, प्रतिष्ठानचे भरत पाटील यांची प्रभाग १ मधील उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने उर्वरित ४ जागांवर प्रतिष्ठानचा उमेदवार विरूध्द सर्वपक्षीय अशी लढत झाल्याचे चित्र होते. दरम्यान, या पोटनिवडणुकीत जव्हार प्रतिष्ठानने विरोधी उमेदवारांना चारीमुंड्या चित करुन आपला झेंडा जव्हारमध्ये रोवल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या निकालामुळे काही महीन्यांवर येऊन ठेपलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये अनेक समिकरणे बदलण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
मतदारांना हे नाही आवडलं ?
मुळात जव्हार नगरपरिषद निवडणूकीत जव्हारकरानी संपूर्ण सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली होती. १७ पैकी तब्बल १४ जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला होता. मात्र, मध्यंतरीच राष्ट्रवादीतुन फूटुन १० जणानी वेगळा गटस्थापन केल्यामुळे नगरपरिषदेचा जास्त वेळ या राजकारणातच गेला. त्यातच पाच नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे पोटनिवडणुक लागली होती. त्यानंतर सर्वपक्षियांनी घेतलेली भूमिका, प्रतिष्ठान लावून धरलेली भुमिका तसेच पुर्वीचे कुरघोडीचे राजकारण याचा विचार करुन जव्हरच्या जनतेने मतपेटीतून आपला कौल दिला.