पोलिसाला मारहाण करणा-या जयेश कोळीने दिली हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 06:03 AM2017-09-18T06:03:58+5:302017-09-18T06:04:00+5:30
कळव्यात हॉटेलचालकाच्या भांडणामध्ये मध्यस्थी करणा-या पोलीस मुख्यालयातील, कॉन्स्टेबल श्रीकांत तळप (२६) यांना मारहाण करणारे सहा ते सात जणांचे टोळके मोकाटच आहे. त्यापैकी जयेश कोळी याला रविवारी सकाळी पकडण्यासाठी गेलेल्या पथकाला त्याने हुलकावणी दिली.
ठाणे : कळव्यात हॉटेलचालकाच्या भांडणामध्ये मध्यस्थी करणा-या पोलीस मुख्यालयातील, कॉन्स्टेबल श्रीकांत तळप (२६) यांना मारहाण करणारे सहा ते सात जणांचे टोळके मोकाटच आहे. त्यापैकी जयेश कोळी याला रविवारी सकाळी पकडण्यासाठी गेलेल्या पथकाला त्याने हुलकावणी दिली.
एका हॉटेलचालकाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणारे कॉन्स्टेबल तळप यांना १४ सप्टेंबर रोजी विटाव्यातील ‘हॉटेल जय मल्हार’मध्ये मॉस्कोटो उर्फ विशाल सोनवणे याच्यासह सात ते आठ जणांनी मारहाण केली होती. त्यातील मॉस्कोटो, शैलेश चव्हाण आणि पालांडे उर्फ बाबल्या या तिघांना पोलिसांनी अटक केली.
तळप हे या हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री जेवणासाठी गेले होते. तिथे मॉस्कोटो याने हॉटेलमालक अनिल शहा यांना शिवीगाळ केली. याच भांडणामध्ये तळप यांनी मध्यस्थी करून, शिवीगाळ का करतोस, असा जाब मॉस्कोटोला विचारला. त्यावर, मॉस्कोटो आणि त्याच्या साथीदारांनी तळप यांनाच मारहाण करून, कोल्ड्रिंक्सची बाटली तळप यांच्या डोक्यात मारून, त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतरही त्यांनी दगड, बांबू आणि काचेच्या बाटल्यांनी तळप व अनिल शहा यांना मारहाण केली. या टोळीतील जयेश कोळी याच्यावर कळवा आणि नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचे तीन गुन्हे दाखल आहेत.
जयेश याच्यासह अजित उत्तेकर उर्फ किरशा, सूरज जाधव आणि इतर चौघांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळीवर अन्य आणखी कोणत्या पोलीस ठाण्यांमध्ये कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, याचाही शोध घेण्यात येत आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून थेट पोलिसालाच या टोळक्याने दहशत पसरविण्यासाठी मारहाण केली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींवर योग्य ती कडक कारवाई केली जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी सांगितले.