ठाण्यातील जयेशचे 'नेट सेट गो'; दृष्टीहीन असूनही नेट परीक्षेत मिळवले घवघवीत यश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 05:12 PM2020-12-03T17:12:37+5:302020-12-03T17:13:12+5:30
net exams : ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा नंबर तीनमधील विरांश कोचिंग क्लासेसचे संचालक जयेश कारंडे यांनी पहिल्याच प्रयत्नात नेट सेट परीक्षा उत्तीर्ण केली.
ठाणे : डोळ्यावर पट्टी बांधली तर चार पावलं चालताना आपण अडखळतो. मात्र दृष्टीहीन असूनही ठाण्याच्या जयेश कारंडे यांनी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ट्वेंटी-ट्वेंटीत अर्थात नेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून दृष्टीहीन असूनही त्यांनी मिळवलेले यश डोळस समाजाला निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा नंबर तीनमधील विरांश कोचिंग क्लासेसचे संचालक जयेश कारंडे यांनी पहिल्याच प्रयत्नात नेट सेट परीक्षा उत्तीर्ण केली. शालेय शिक्षण आरजे ठाकूरमधून झालेल्या जयेश यांनी एमबीए देखील पूर्ण केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जयेश हे दृष्टिहीन असूनही त्यांनी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टच्या या 'नेत्रदीपक' यशाला गवसणी घातल्याने भविष्यात ते प्राध्यापक म्हणून रुजू होणार आहेत. त्यांच्या या कामगिरीचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी भरभरून कौतुक केले.
पाचंगे यांनी जयेश कारंडे यांनी व्यक्तिशः भेट घेत त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबाबत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मनविसे उपशहर अध्यक्ष संदीप चव्हाण, विभाग सचिव मयूर तळेकर, उपविभागाध्यक्ष मंदार पाष्टे व शाखाध्यक्ष निखिल येवले, आकाश मोरे तसेच रोशन पाष्टे,विघ्नेश शेलार, प्रशांत पालव, विश्वजित शिंदे, अंकुश धंदर आदी उपस्थित होते.
चाळीतील घरातून आखला यशाचा महामार्ग
लोकमान्यनगर परिसरात दाटीवाटीने असलेल्या चाळीमध्ये जयेश राहतात. दृष्टीहीन असूनही प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश खेचून आणले. परीक्षेत रायटर घेऊन त्यांनी त्यांच्या यशाचा मार्ग आखला.