जयजीत सिंह ठाण्याचे नवे आयुक्त; विनीत अग्रवाल एटीएस प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 07:44 AM2021-05-25T07:44:11+5:302021-05-25T07:44:43+5:30
Maharashtra Police News: जयजीत सिंह यांच्या बदलीने रिक्त झालेल्या एटीएस प्रमुख पदाची जबाबदारी गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष ) असलेल्या विनीत अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मुंबई : ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त कोण होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर, सोमवारी राज्य दहशतवाद विभागाचे (एटीएस) प्रमुख जयजीत सिंह यांची ठाणे शहर पोलीस दलाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जयजीत सिंह यांच्या बदलीने रिक्त झालेल्या एटीएस प्रमुख पदाची जबाबदारी गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष ) असलेल्या विनीत अग्रवाल यांच्याकडे तर, अग्रवाल यांच्या जागी राज्य पोलीस दलातील विशेष अभियान विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जयजीत सिंह हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एटीएस प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचीही धुरा सांभाळली आहे. तसेच मुंबई रेल्वे पोलीस अतिरिक्त महासंचालक म्हणून काम पाहिले आहे. ‘अँटलिया’ येथील स्फोटके प्रकरणाचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.