आरटीओने वसईत नष्ट केल्या जेसीबीने दीडशे रिक्षा
By admin | Published: January 11, 2016 01:47 AM2016-01-11T01:47:15+5:302016-01-11T01:47:15+5:30
आरटीओने वसईतील भंगार रिक्षांविरोधात धडक मोहिम हाती घेतली असून आतापर्यत ३५० रिक्षा जप्त करून त्यापैकी १५० रिक्षा जेसीबीच्या साहय्याने कायमच्या नष्ट करण्यात आल्या आहेत
शशी करपे, वसई
आरटीओने वसईतील भंगार रिक्षांविरोधात धडक मोहिम हाती घेतली असून आतापर्यत ३५० रिक्षा जप्त करून त्यापैकी १५० रिक्षा जेसीबीच्या साहय्याने कायमच्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तर कारवाईत नऊ महिन्यांत १६ लाखांचा दंडवसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अधिकृत रिक्षा स्टँण्डसाठी १५० ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून त्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.
बेकायदा आणि भंगार रिक्षांमुळे वसईत वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून आरटीओ कार्यालयातून अशा रिक्षांविरोधात धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. गेल्या नऊ महिन्यात वसईतून सुमारे ३५० भंगार रिक्षा शोधण्यात आल्या आहेत. पूर्वी भंगार रिक्षा मोडित काढण्यासाठी गॅस कटरचा वापर केला जात होता. पण, कटरने कापल्यानंतर पुन्हा रिक्षा तयार करून बेकायदेशिरपणे वापरात आणल्या जात होत्या. म्हणूनच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी जेसीबी मशिनने रिक्षा कायमस्वरुपी नष्ट करण्यास सुरुवात केली. आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत १५० रिक्षा नष्ट करण्यात आल्या आहेत. आरटीओने रिशांची तपासणी करून अधिकृत रिक्षावर परवाना क्रमांक आणि परवान्यांची मुदत ठळक अक्षरश: रिक्षांच्या दोन्ही बाजूला लिहीणे बंधनकारक केले. त्यामुळे अधिकृत रिक्षा कोणत्या हे ओळखणे सोपे झाले आहे.