ठाण्यातील २७ लाखांच्या जेसीबी चोरीची अवघ्या २४ तासांमध्ये उकल: दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 09:49 PM2020-02-03T21:49:24+5:302020-02-03T21:58:35+5:30
ठाण्यातील घोडबंदर रोड येथून चोरीस गेलेल्या २७ लाखांच्या जेसीबीच्या चोरीची अवघ्या २४ तासांमध्ये उकल करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. मुरबाड येथून हा जेसीबी हस्तगत करण्यात आला असून सुमित चितारे आणि चंद्रकांत पोटे या दोन्ही आरोपींना पुण्यातील दौंड येथून अटक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाघबीळ येथून चोरीस गेलेल्या २७ लाखांच्या जेसीबीच्या चोरीची अवघ्या २४ तासांमध्ये उकल करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुमित चितारे (२१, रा. आलेगाव, दौंड, पुणे) आणि चंद्रकांत पोटे (१८, रा. बारीवेल, दौंड, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून हा जेसीबीही हस्तगत करण्यात आला आहे.
वाघबीळ येथील रहिवाशी अभिमन्यू मढवी यांनी व्यावसायिक कामाच्या वापराचे त्यांचे जेसीबी हे वाहन २४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाघबीळ रोडवरील मोकळया जागेत उभे करुन ते घरी गेले होते. ते २५ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. च्या सुमारास त्यांच्या कामासाठी जेसीबी उभे केलेल्या ठिकाणी आले. तेंव्हा त्यांच्या जेसीबीची चोरी झाल्याचे आढळले. त्यांनी ठाणे मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांच्या या महागडया वाहनाचा शोध घेतला. ते कुठेही आढळून न आल्याने अखेर याप्रकरणी त्यांनी १ फेब्रुवारी रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाची या प्रकरणासाठी नियुक्ती केली. घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही तसेच तांत्रिक मदतीच्या आधारावर सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, पोलीस हवालदार एस. बी. खरात, आर. एस. चौधरी आणि पोलीस नाईक आर. एस. महापुरे आदींच्या पथकाने कल्याण, मुरबाड, जुन्नर, पारनेर आदी भागांमध्ये आरोपींचा शोध घेतला. जेसीबीची चोरी करणारे हे पुणे जिल्हयातील दौंड येथील असल्याची खबऱ्यांकडून खात्रीशीर टीप या पथकाला मिळाली. त्यानंतर दौंड तालुक्यातील बोरीवेल आणि आलेगाव येथे सापळा रचून सुमित आणि चंद्रकांत या दोघांनाही २ फेब्रुवारी रोजी अटक करुन त्यांच्याकडून चोरीतील हा २७ लाखांचा जेसीबी हस्तगत केला. त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांचा तिसरा साथीदार बाळासाहेब पोटे याचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.............................
चोरीनंतर जेसीबी नेला मुरबाडकडे
जेसीबीची चोरी केल्यानंतर सुमित चितारे आणि चंद्रकांत या दोघांनी कल्याण- मुरबाड मार्गे हा जेसीबी नेला. तिथे रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या एका मोकळया जागेमध्ये हा जेसीबी उभा करुन ते दौंडमध्ये पसार झाले होते. त्यांच्या मागावर असलेल्या कासारवडवली पोलिसांनी हा जेसीबी आणि तो चोरणाºया दोघांना दौंड येथून अटक केली आहे. जेसीबीच्या मागोमाग मोटारसायकलीवरुन टेहळणी करीत जाणारा बाळासाहेब पोटे हा मात्र पसार झाला आहे.