जीन्स कारखान्यांची सुरू होणार उल्हासनगरात धडधड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:50 AM2018-10-06T05:50:01+5:302018-10-06T05:50:45+5:30
पंचम कलानी : ईटीपी प्लांट बसवणाऱ्यांना देणार परवानगी
उल्हासनगर : जीन्स कारखान्यांना ईटीपी प्लांट बसवण्याची परवानगी प्रदूषण मंडळाने दिल्याने कारखान्यांची धडधड पुन्हा सुरू होईल, असे महापौर पंचम कलानी यांनी सांगितले. जीन्स कारखान्यांतील सांडपाण्यामुळे वालधुनी नदी प्रदूषित झाल्याचा ठपका ठेवत महापालिकेने जीन्स कारखान्यांवर कारवाई केली होती. यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले होते.
उल्हासनगरमध्ये देशातील दुसºया नंबरचा जीन्स उद्योग भरभराटीला आला आहे. ५० हजारांपेक्षा जास्त कामगार काम करत असून कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, मध्यंतरी उल्हास, वालधुनी नदी प्रदूषित झाल्याप्रकरणी एका पर्यावरणप्रेमी संस्थेने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. नदीला प्रदूषित करणाºया नदीकाठच्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने महापालिकेला दिला. त्यानुसार, उल्हासनगर पालिकेने जीन्स कारखान्यांवर कारवाई करून ते बंद केले. या कारवाईने कामगार बेकार झाले. विनापरवाना सुरू असलेल्या जीन्स वॉश कारखान्यांवर गंडांतर आल्यावर जीन्स कारखानदारांनी मुख्यमंत्र्यांसह स्थानिक नेत्यांना साकडे घातले. जीन्स कारखान्यांनी स्वत:चा ईटीपी प्लांट उभारावा, असा सल्ला प्रदूषण मंडळाने दिला. जे कारखानदार असा प्लांट उभारतील, त्यांनाच मंडळ जीन्स कारखाने सुरू करण्याची परवानगी देईल, असे मंडळातर्फे सांगण्यात आले.
दोन कारखानदारांनी प्लांट उभारून प्रदूषण मंडळाची एनओसी आणली आहे. मंडळाने एनओसी दिली असली तरी ‘निरी’ संस्थेकडून प्लांटबाबत रीतसर परवानगी घेणे गरजेचे असल्याचे मत प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांना दिले. ‘निरी’ संस्थेने ईटीपी प्लांटबाबत परवानगी दिल्यावर कारखाने सुरू होतील, असा विश्वास महापौर कलानी यांनी व्यक्त केला. एकूण ५८ जीन्स कारखानदारांनी प्लांट उभारण्याची तयारी दर्शवली आहे.
महापौरांच्या हस्ते पत्र
जीन्स कारखानदारांनी महापौर पंचम कलानी यांची गुरुवारी भेट घेऊन प्रदूषण मंडळाकडून जीन्स कारखान्यांच्या ईटीपी प्लांटला मिळालेल्या एनओसीची माहिती दिली.
सांडपाणी थेट नदीत सोडण्याऐवजी प्लांटमध्ये प्रक्रिया करून सोडले जाणार आहे. मंडळाच्या एनओसीनंतर ‘निरी’ संस्थेचीही एनओसी घ्यावी लागणार आहे.
महापौर कलानी यांच्या हस्ते मंडळाने दिलेली एनओसी कारखानदारांना देण्यात आली. यावेळी ओमी कलानी, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, आयुक्त गणेश पाटील आदी उपस्थित होते. पालिका, प्रदूषण मंडळाने उचललेल्या सकारात्मक पावलाचे कारखानदारांनी स्वागत केले असून पुन्हा उद्योगनगरी गजबजणार आहे.