टिटवाळयात अवतरली खंडेरायाची जेजुरी; 'येळकोट येळकोट जय मल्हार"चा घुमणार नाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 04:57 PM2019-09-03T16:57:43+5:302019-09-03T16:58:25+5:30
ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यामधील मांडा टिटवाळा गावचे गणेशभक्त रत्नाकर धर्मा पाटील गेल्या 22 वर्षांपासून आपल्या घरगुती गणेशोत्सवात नवनवीन देखावे साजरे करत असतात.
उमेश जाधव
टिटवाळा - आपल्या लाडक्या गणेशाची प्रतिष्ठापना करून अत्यंत आनंदी वातावरणात सर्व देशभर हा गणेशोत्सव साजरा होत आहे. या धर्तीवर टिटवाळयातील रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणपतीची सजावट ही देखील दरवर्षी टिटवाळा शहरातील खास आकर्षण असते. नयनरम्य डोळ्याचे पारणे फेडणारी अशी आरास हे जणू काय समीकरणच गेली १९ वर्षा पासून झालेले आहे. मांडा गावातील रत्नाकर पाटील यांचे वडील धर्मा पाटील हे हयात असताना कल्पकतेने आपल्या घरगुती गणपती सजावटीत स्वत: वेगवेगळे देखावे साकारायचे, त्यांच्यातला हा कलात्मक गुण त्यांचे सुपुत्र रत्नाकर पाटील यांनी आत्मसात करत तोच वारसा पुढे चालू ठेवला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यामधील मांडा टिटवाळा गावचे गणेशभक्त रत्नाकर धर्मा पाटील गेल्या 22 वर्षांपासून आपल्या घरगुती गणेशोत्सवात नवनवीन देखावे साजरे करत असतात. परिसरातील गणेशभक्त, बाळ गोपाळ व नागरिकांना मुंबई-पुण्यातील अनोखे देखावे पाहण्यासाठी जाणे होत नाही म्हणूनच आपल्या परिसरातच गणेश भक्त असलेले रत्नाकर पाटील हे आपल्या घरगुती गणेशोत्सवात प्रत्येक वर्षी नवनवीन देखावे तयार करतात. एक महिन्यापासून पूर्वतयारी करून तन, मन व धनाने अत्यंत मेहनतीने सुबक आणि सुंदर असा पाटील कुटुंबाचा दरवर्षी अगळा-वेगळा देखावा असतो. या वर्षी तर महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा श्री खंडेराया यांचे जेजुरीचे अनोख्या मंदिर स्वरूपातील देखावा तयार करण्यात आला आहे. यामुळे मांडा टिटवाळा येथे १० दिवस "येळकोट येळकोट जय मल्हार " चा नाद घुमणार असून गणेशभक्तांना गणरायासह आपल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाचा आनंदही घेता येणार आहे.
रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणेश दर्शन देखाव्यांमध्ये प्रथमदर्शनी मुख्य दरवाजावर सुंदर असे "तुळशी वृंदावन साकारले आहे. गुहेप्रमाणे असणाऱ्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर जेजुरी पर्वतगड यावर "शिवलिंग आकारातले मृत्यू लोक, दुसरे कैलास शिखर. येळकोट येळकोट जय मल्हार असा संदेश सर्वत्र दिसून येत आहे. हॉलमध्ये महाकाय त्रिशूळ डमरू त्यावर सुंदर अशी अडीच फुटाची मनमोहक "श्रीगणेशाची" सुंदर सुबक अशी मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. श्री गणेशाचे दर्शन घेतल्यावर पाठीमागे महाकाय "श्री विष्णूचे वाहन, खंडेरायाची जेजुरी, समोरच मुख्य प्रांगणात अतिशय उंच असा १५४ दिव्यांचा "दीपस्तंभ, बाजूलाच" श्री म्हाळसा देवी, "मधोमध" श्री काळभैरव "आणि "श्री जानाई देवी", सर्वत्र " येळकोट येळकोट जय मल्हार " संदेश, उंच पर्वतावर "ब्रह्मा "विष्णू "आणि महेश "महादेवाच्या मस्तकावर सुंदर "चंद्रकोर आणि गंगा "अशा मंगलमय वातावरणात गणेश दर्शन घेतल्यानंतर ही काही काळ थांबावे असे प्रत्येकाच्या मनात येते. हे पाहत असताना साक्षात जेजुरीला आलो परंतु माझा मल्हारी मार्तंड कुठे आहे असे मनात येताच समोरच्या डोंगरावर "श्री मल्हारी मार्तंड "जेजुरीचा राजा साक्षात महाकाय तलवारी सोबत "श्री महादेव "सिंहासनावर बसलेले दोन्ही बाजूला भालधारीमार्तंडाचे दर्शन होते. अभूतपूर्व जेजुरीचे दर्शन घेऊन रत्नाकर पाटील यांच्या घरी श्री दर्शनासाठी आलेले भक्तजन मुखातून" येळकोट येळकोट जय मल्हार " जयघोष करीत गडावरून गुहे मार्गे पुन्हा पुढच्या वर्षी आणखी नवीन काहीतरी पाहण्यासाठी आम्ही नक्कीच येणार असे सांगत जेजुरी "श्री खंडेरायाचे " दर्शन घेऊन आनंदाने मार्गस्थ होतात. असे मत यावेळी पाटील यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.
आपले वडील धर्मा पाटील यांनी सन १९९९ पासून ही सजावटीची परंपरा चालू केली. सुरुवातीला चलचित्र नव्हती मात्र देखाव्याच्या माध्यमातुनाही हुबेहूब प्रतीकृती वडील साकारत असत. तेव्हा फार अप्रूप वाटायचे आणि ते पाहून मलाही त्यात गोडी निर्माण झाल्याचे रत्नाकर पाटील सांगतात. चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आतापर्यंत पाटील यांनी सत्यनारायण कथा, तुकाराम महाराज वैकुंठ गमन, गंगा अवतरण, बजरंगबली आपल्या बाहूवर राम –लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन जात असतानाचा देखावा, शिवाजीमहाराज राज्यभिषेक सोहळा, शिर्डी समाधी मंदिर तर गेल्या वर्षी दत्तात्रेय अवताराचा देखावा हा एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात असल्याची अनुभूती पाहणाऱ्याला यावी इतका जिवंतपणा तो साकारण्यात आला होता. या देखाव्यासाठी पाटील कुटुंबासोबत मित्रपरिवार आणि घरच्यासारखे कामगार, मित्र इच्छेप्रमाणे देखावा तयार करण्यासाठी उपलब्ध होतात, यामुळेच आम्ही आपणा गणेश भक्तांना येथे साक्षात जेजुरी दर्शन देऊ शकलो असे रत्नाकर पाटील यांनी बोलतांना सांगितले.
श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत दिवसातून दोन वेळा सकाळी ठीक १२.०० वा. आणि सायंकाळी ठीक ७.०० वा. श्रींची महाआरती होते. त्याचप्रमाणे संपूर्ण दहा दिवस पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाच्या वतीने प्रत्येक दिवशी वेगवेगळे भजन मंडळ आपल्या सुस्वर वाणीतून जनहितासाठी प्रेरणादायी ताल व लयबद्ध भजने या ठिकाणी सादर होणार असल्याचीही माहिती पाटील यांनी दिली.