डोंबिवलीतील ज्वेलर्स मालक, कारागिरांची 3 कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 07:45 AM2021-03-17T07:45:38+5:302021-03-17T07:46:13+5:30
डोंबिवली येथे राहणारे सचिन चव्हाण यांचे रेणुका ज्वेलर्स नावाने नवीन पनवेल येथे दुकान आहे. उत्तम सामंतो आणि गौतम सामंतो यांचा झवेरी बाजार येथे सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे.
नवीन पनवेल : मुंबईच्या झवेरी बाजार येथील उत्तम व गौतम सामंतो यांनी सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ३ कोटी ५८ लाख ४५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. सामंत बंधूंच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली येथे राहणारे सचिन चव्हाण यांचे रेणुका ज्वेलर्स नावाने नवीन पनवेल येथे दुकान आहे. उत्तम सामंतो आणि गौतम सामंतो यांचा झवेरी बाजार येथे सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे. एप्रिल २०१९ मध्ये सुब्रतो मंडल या कारागिराच्या माध्यमातून चव्हाण यांनी सामंतो यांना वेगवेगळ्या साईजचे सोन्याचे गंठण आणि नेकलेस बनवून देण्यासाठी दोन किलो ३० ग्रॅम शुद्ध सोने दिले होते. या वेळी सामंतो बंधूंनी एक महिन्यामध्ये दागिने बनवून देतो, असे सांगितले. महिन्याभरानंतर चव्हाण यांनी मंडल यांच्याकडे दागिन्यांबाबत विचारणा केली असता सामंतो बंधूंनी त्याच्याकडे इतर दागिन्यांची ऑर्डर असल्याचे सांगितले. चव्हाण यांना दागिने हवे असल्याने त्यांनी मे २०१९ मध्ये शामल मेटे या दुसऱ्या कारागिराला सोने दिले.
शामल मेटे यांनी सामंतोंकडेच दागिने बनवण्यासाठी दिले. त्यानंतर चव्हाण यांनी जुलै २०१९ मध्ये कारागीर स्वपन सामंतोकडे मंगळसूत्र बनवण्यासाठी ७१० ग्रॅम वजनाचे सोने दिले होते. तसेच सप्टेंबर २०१९ मध्ये श्यामसुंदर आदक यांच्याकडे ५६० ग्राम सोने दिले होते. त्यानंतर भारत दादा पुजारीला मंगळसूत्र बनवण्याची ऑर्डर देऊन ३४७ ग्रॅम शुद्ध सोने दिले होते. आणि अर्जुन शंकर पंडित याला मंगळसूत्र आणि हार बनविण्यासाठी एक किलो ८२९ ग्रॅम वजनाचे सोने दिले होते. अशा पद्धतीने चव्हाण यांनी वेगवेगळ्या कारागिरांना तीन कोटी ८ लाख ४५ हजार रुपये किमतीचे तब्बल सहा किलो ७४९ ग्रॅम शुद्ध सोने दिले. मात्र, सर्व कारागिरांनी ते मुंबईतील झवेरी बाजारातील सामंतो बंधूंच्या कारखान्यात दागिने बनविण्यासाठी दिले. त्या वेळी सामंतो बंधूंनी कारणे सांगून त्यांनी तयार केलेले दागिने देण्यास टाळाटाळ केली.
फोन घेणेसुद्धा केले बंद
मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याचे कारण सांगत सामंतो बंधूंनी कारखाना चालू होताच सोन्याचे दागिने बनवून देण्याचे आश्वासन दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरदेखील त्यांनी सचिन चव्हाण आणि इतर कारागिरांचे सोने आणि दागिने दिले नाहीत. तसेच त्यांचे फोन घेणेसुद्धा बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सचिन चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सामंतो बंधूंनी अशाच पद्धतीने १० ते १५ ज्वेलर्स आणि कारागिरांकडून सोने घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.