धान्यवाटप सुरू असल्याची बतावणी करून दागिने लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:40 AM2021-03-18T04:40:04+5:302021-03-18T04:40:04+5:30
ठाणे : धान्यवाटप सुरू असल्याची बतावणी करून चोरट्यांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह ३० हजार १५० रुपयांचे दागिने लुबाडल्याची घटना महात्मा फुलेनगर ...
ठाणे : धान्यवाटप सुरू असल्याची बतावणी करून चोरट्यांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह ३० हजार १५० रुपयांचे दागिने लुबाडल्याची घटना महात्मा फुलेनगर भागात रविवारी घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातील तुळशीधाम येथे राहणाऱ्या रतन सोनावणे (५८) या १४ मार्चला दुपारी १ च्या सुमारास आरजे ठाकूर शाळेकडून महात्मा फुले नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर साफसफाईचे काम करीत होत्या. त्याचवेळी तिथे आलेल्या दोघा भामट्यांनी एक सरदारजी गरिबांना तांदूळ, डाळ आणि गहूवाटप करीत असल्याची त्यांना बतावणी केली. त्यानंतर त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र पाकिटात ठेवण्यास सांगितले. नंतर ते पाकीट पिशवीत ठेवत असल्याचा बहाणा करून ते त्यांनी लुबाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रतन यांनी या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. के. येरुणकर हे अधिक तपास करीत आहेत.
---------------