ठाण्यात चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला झारखंडमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 10:12 PM2019-11-22T22:12:27+5:302019-11-22T22:20:10+5:30
ठाण्यातील हिरानंदानी मेडोज या उच्चभ्रू वसाहतीमधील निवृत्त आयकर अधिकाऱ्याच्या घरातच तब्बल ३९ लाखांच्या ऐवजाची चोरी करुन पसार झालेल्या हिरालाल गोराइन या नोकराला चितळसर पोलिसांनी थेट झारखंड येथून अटक केली आहे. त्याच्याकडून २९ लाखांचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे.
ठाणे : हिरानंदानी मेडोज सोसायटीतील एका घरातील हिरालाल गोराइन या नोकराने त्याच घरात ३९ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून पलायन केले होते. त्याला दागिन्यांसह अवघ्या तीन दिवसांमध्ये झारखंड राज्यातून चितळसर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून १० हजारांच्या रोकडसह २९ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
ठाण्यातील हिरानंदानी मेडोज सोसायटीच्या २१ व्या मजल्यावर राहणारे निवृत्त आयकर अधिकारी राधारमन त्रिपाठी यांच्या घरात ते गावी गेल्यानंतर १ नोव्हेंबर २०१९ रोजी सोने, चांदी आणि इतर ऐवजासह ३९ लाखांची चोरी झाली होती. त्रिपाठी हे १५ नोव्हेंबर रोजी गावाहून परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या घरात विविध कामांसह चालकाचेही काम करणारा नोकर हिरालाल याच्यावर त्यांनी या चोरीबाबत संशय व्यक्त केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे, पोलीस हवालदार रंगराव पाटील आणि पोलीस नाईक सतीश सुर्वे यांचे एक पथक तयार केले. हिरालाल हा झारखंड राज्यातील बोकारो या गावी पळाल्याची माहिती समोर आल्यानंतर रोकडे यांचे पथक थेट बोकारो येथे पोहोचले. चितळसर पोलिसांनी झारखंड राज्यातील स्थानिक पोलीस, गावकरी यांच्या मदतीने १८ नोव्हेंबर रोजी हिरालालचे घर शोधून काढले. मात्र, तो त्यावेळी तिथे आढळला नाही. झारखंड भागात विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्यामुळे त्या भागात संवेदनशील वातावरण होते. अशा वातावरणामध्ये स्थानिक नागरिकांना विश्वासात घेत कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता हिरालाल याला या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्या ताब्यातून सुमारे २९ लाखांचा ऐवजही हस्तगत केला. यामध्ये हिऱ्यांच्या आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितले. हिरालाल याला २१ नोव्हेंबर रोजी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.