जप्तीच्या कारवाईमुळे बिल्डर झोजवालांची आत्महत्या, एमसीएचआयचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:55 AM2018-03-07T06:55:06+5:302018-03-07T06:55:06+5:30

कल्याणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आसीफ झोजवाला (५६) यांच्यावर ओपन लॅण्ड टॅक्सच्या थकबाकी वसुलीकरिता जप्तीची कारवाई केल्यानेच त्यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कल्याणमधील एमसीएचआयच्या पदाधिका-यांनी केला.

 Jholwala's suicide due to seizure action, MCHI alleged | जप्तीच्या कारवाईमुळे बिल्डर झोजवालांची आत्महत्या, एमसीएचआयचा आरोप

जप्तीच्या कारवाईमुळे बिल्डर झोजवालांची आत्महत्या, एमसीएचआयचा आरोप

Next

कल्याण - कल्याणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आसीफ झोजवाला (५६) यांच्यावर ओपन लॅण्ड टॅक्सच्या थकबाकी वसुलीकरिता जप्तीची कारवाई केल्यानेच त्यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कल्याणमधील एमसीएचआयच्या पदाधिका-यांनी केला. झोजवाला यांच्या आत्महत्येकरिता बिल्डर संघटना केडीएमसी प्रशासनाला जबाबदार धरत असताना त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत मौन धारण केले आहे, तर केडीएमसीने हा आरोप फेटाळून लावला आहे. एमसीएचआयचे कल्याणचे अध्यक्ष मनोज राय हे झोजवाला यांच्या आत्महत्येच्या घटनेची वार्ता समजल्यापासून इस्पितळात दाखल आहेत, अशी माहिती एमसीएचआयचे सदस्य रवी पाटील यांनी दिली. एमसीएचआयचे सदस्य बुधवारी केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजाही ठोठावणार आहेत. झोजवाला यांच्या आत्महत्येबाबत दावे-प्रतिदावे केले जात असले, तरी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या आत्महत्येचा तपास सुरू केला आहे. झोजवाला यांच्या आत्महत्येमागील विविध कारणांची पोलीस पडताळणी करत आहेत.
मुरबाड रोड परिसरात झोजवाला यांचा ‘राणी मॅन्शन’ हा बंगला आहे. याच बंगल्याच्या गच्चीवर सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. शवविच्छेदन रुक्मिणीबाई रुग्णालयात करण्यात आले.

आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी झोजवाला कॉफी प्यायले. दुपारी ४च्या सुमारास बंगल्याच्या गच्चीवर येरझारा करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत होते. त्यानंतर, त्यांनी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली.
मंगळवारी झोजवाला यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. टिटवाळा येथील जागेच्या वादासंदर्भात झोजवाला यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात जायचे होते.
मनमिळाऊ स्वभावाचे झोजवाला हे भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यापूर्वी त्यांनी जिल्ह्याचे कोषाध्यक्षपद भूषवले होते तसेच ते एमसीएचआयचे सदस्य होते.

मानसिक तणाव हेच कारण?

गेल्या वर्षभरात नोटाबंदीसह घेण्यात आलेल्या निर्णयाचा बांधकाम व्यवसायावर विपरित परिणाम झाला होता. त्यामुळे बाजारात आलेल्या मंदीमुळे नवीन घर घेणाºया ग्राहकांची संख्या घटल्याने बांधकाम व्यवसायाला अवकळा प्राप्त झाली. पालिकेला घनकचरा व्यवस्थापन करण्यात अपयश आल्याने उच्च न्यायालयाने दोन वर्षे नवीन विकासकामे करण्यास बंदी घातली होती.
ती उठवण्यात आली. त्यापाठोपाठ नोटाबंदीचा फटका बसला. त्यापाठोपाठ आलेला महारेरा आणि जीएसटी यामुळेदेखील बांधकाम व्यावसायिकांना काही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर झोजवाला ताणतणावाखाली असल्याची शक्यता त्यांचे सहव्यावसायिक व्यक्त करत आहेत.

झोजवाला यांची मालमत्ता जप्त
ओपन लॅण्ड टॅक्स न भरल्याने महापालिकेने झोजवाला यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली होती. जप्त मालमत्तेचा लिलाव केला होता. या घटनेचा झोजवाला यांनी धसका घेतला होता. एमसीएचआयच्या पदाधिकाºयांसोबत झोजवाला याविषयी बोलत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ओपन लॅण्ड टॅक्सची थकबाकी न भरल्याने बजावलेल्या नोटिसा व केलेली जप्तीची कारवाई याचा आणि एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येचा संबंध जोडणे योग्य नाही. - विनय कुळकर्णी, करनिर्धारक व संकलक, केडीएमसी

बदनामीच्या धसक्याने झोजवाला यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा आमचा कयास आहे. ओपन लॅण्ड टॅक्स कमी झाला. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामध्ये महापालिकेने जप्ती सुरू केल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
- विकास वीरकर, सचिव, एमसीएचआय

मंगळवारी सकाळी ९ वाजता पश्चिमेतील बारदान गल्ली येथील दफनभूमीत त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच बांधकाम व्यावसायिक असे विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. झोजवाला यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. झोजवाला यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट करण्यात येत आहे.

Web Title:  Jholwala's suicide due to seizure action, MCHI alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.