मेडिकल शिक्षणासाठी गरजवंत विद्यार्थ्यास जिजाऊ संघटनेने दिला मदतीचा हात
By नितीन पंडित | Published: January 31, 2024 04:56 PM2024-01-31T16:56:01+5:302024-01-31T16:56:58+5:30
भिवंडी तालुक्यातील अंजुर येथील सोनू पाटील हा एम बी बी एस चे शिक्षण परदेशात घेत आहे.
भिवंडी: ठाण्यासह कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक सेवाकार्य करणाऱ्या जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी घरच्या आर्थिक कुचंबणेमुळे मेडिकलचे शिक्षण अर्धवट राहण्याची भीती निर्माण झालेल्या विद्यार्थ्याला अडीच लाखांची मदत केली आहे.
भिवंडी तालुक्यातील अंजुर येथील सोनू पाटील हा एम बी बी एस चे शिक्षण परदेशात घेत आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांना कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने वडिलांच्या उपचारांवर पैसे खर्च होत असल्याने सोनू पाटील याला चौथ्या वर्षाची शैक्षणिक फी भरण्याची आर्थिक कुचंबणा झाली होती.ही बाब जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांना समजताच त्यांनी भिवंडी येथे सुरू असलेल्या आगरी महोत्सवात हजेरी लावत आगरी महोत्सवाचे संस्थापक विशुभाऊ म्हात्रे यांच्या हस्ते दोन लाख चाळीस हजार रुपयांचा धनादेश सोनू पाटील यास सुपूर्द केला. या प्रसंगी आगरी महोत्सवाचे आयोजक दयानंद चोरघे,सोन्या पाटील,यशवंत सोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे,शासकीय उच्चपदस्थ अधिकारी पदावर पोहचले पाहिजेत हा ध्यास जिजाऊ संघटनेचा असून त्यासाठी जाता पात धर्म भेद बाजूला सारून जिजाऊ अशा होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहणार असा विश्वास निलेश सांबरे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.