जिमच्या व्यावसायिकाची १७ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:00 AM2019-11-21T00:00:10+5:302019-11-21T00:00:17+5:30
भागीदारांविरोधात गुन्हा; धनादेशावर केल्या बनावट स्वाक्षऱ्या
ठाणे : ठाण्यातील ‘बॉडीझोन’ या जिममालकाची दीपाली आठवले, पंकज आठवले आणि कनोज उतेकर या तिघांनी १७ लाख ४० हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नौपाड्यातील विष्णुनगर भागात राहणारे पंकज आठवले, दीपाली आठवले, कनोज उतेकर आणि तक्रारदार चिन्मय चटर्जी हे चौघेही बॉडीझोन जिममध्ये भागीदार आहेत. दीपाली आणि कनोज या भागीदारांनी जिमच्या व्यवसायातील नफा झालेल्या रकमेच्या व्यवहारात गैरव्यवहार केल्यामुळे सारस्वत बँकेच्या लेखापरीक्षण अहवालानुसार १७ लाख ४० हजारांचा तोटा चटर्जी यांना झाल्याची बाब समोर आली. त्यानुसार या दोघांनी त्यांच्या १७ लाख ४० हजारांचा अपहार करून फसवणूक केल्याचे उघड झाले.
अन्य एक आरोपी पंकज आठवले याने बॉडीझोन जिमचे चालू खाते असलेल्या सारस्वत बँकेच्या तीन वेगवेगळ्या धनादेशांवर बनावट स्वाक्षºया करून हे धनादेश पुण्याच्या गजानन एंटरप्रायजेस यांना दिले. हे धनादेशही वठले न गेल्याने (बाउन्स झाल्याने) गजानन एंटरप्रायजेस यांनी चटर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण प्रकार जून २०१८ ते जानेवारी २०१९ या काळात घडला. आठवले आणि उतेकर यांनी फसवणूक केल्यामुळे चटर्जी यांच्याविरुद्ध नाहक गुन्हा दाखल झाला. या फसवणुकीनंतर आपल्याला मोठा धक्का बसून मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे तक्रारदार चिन्मय चटर्जी यांनी सांगितले. याप्रकरणी नौपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुरावा गोळा करण्याचे काम सुरू
विनाकारण मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे तसेच आपली फसवणूक झाल्यामुळे त्यांनी अखेर याप्रकरणी उतेकर याच्यासह तिघांविरुद्ध १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी चौकशी सुरू असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. त्यामुळे अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.