Jitendra Awhad: मंत्रीपद जाताच आव्हाड रस्त्यावर, बायपासवरील खड्डे अन् सळया पाहून संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 03:20 PM2022-07-12T15:20:25+5:302022-07-12T15:22:09+5:30
Jitendra Awhad: राज्यातील विविध महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचा ठेका दिला
ठाणे - पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून अपघाताच्या घटना घडत आहेत. तर, मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून रस्त्यांत खड्डेही पडत आहेत. ठाणे जिल्ह्यातील खड्ड्यांचा प्रश्नही चांगलाच समोर आला. ठाण्याचे नेते आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्याच्या रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तर, दुसरीकडे मंत्रीपद गेल्यानंतर आता जितेंद्र आव्हाडही थेट रस्त्यावर उतरले आहेत.
राज्यातील विविध महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचा ठेका दिला. मात्र, दुरुस्त केलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहन चालक व नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक घेऊन रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधत अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत. तर, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड हेही रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. सोमवारी त्यांनी मुंब्रा बायपासवरील खराब झालेल्या रस्त्याची पाहणी केली.
काम सुरु करु असे त्यांनी आश्वासन दिले होते. अजूनही काम सुरु झालेले नाही. ह्या कामाला उशीर झाला तर या ठिकाणी मोठा अपघात घडू शकतो अशी मला शक्यता वाटते. तरी त्वरीत या कामाला सुरुवात करायला हवी.@CMOMaharashtra@mieknathshinde
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 11, 2022
''आज मी स्वत: मुंब्रा बायपासची पाहणी केली. मुंब्रा बायपासच्या रेतीबंदर पट्ट्यामध्ये जिथून बायपास उतरायला सुरुवात होते तिथे तीन मोठे खड्डे पडलेले आहेत व खालील सळ्या देखील दिसत आहेत. याप्रकरणी मी गेले दोन दिवस संबंधीत अधिकाऱ्यांशी बोलत आहे. काम सुरु करु असे त्यांनी आश्वासन दिले होते. अजूनही काम सुरु झालेले नाही. ह्या कामाला उशीर झाला तर या ठिकाणी मोठा अपघात घडू शकतो अशी मला शक्यता वाटते. तरी त्वरीत या कामाला सुरुवात करायला हवी'', असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे, आपले मंत्रीपद सोडल्यानंतर जितेंद्र आव्हाड पुन्हा रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज असल्याचे दिसून आले.