जीव गेला तरी ‘सीएए’ लागू होऊ देणार नाही - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:57 AM2020-01-21T01:57:49+5:302020-01-21T02:04:17+5:30
आंदोलनादरम्यान तुमच्या दिशेने दगड आला, तर प्रत्युत्तर न देता संविधानाला ढाल म्हणून पुढे करा. देश हेगडेवार, गोवळवलकरांच्या नाही तर, गांधीजी, आंबेडकरांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरुच्चार आव्हाड यांनी केला.
मुंब्रा : सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशाचे तुकडे होण्याची शक्यता आहे. परंतु जीव गेला तरी बेहत्तर हा कायदा महाराष्ट्रात मी लागू होऊ देणार नाही, अशी ठोस ग्वाही गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री मुंब्रा-कौसा परिसरात आयोजित नागरी सत्कार समारंभात दिली. आव्हाड म्हणाले की, स्वातंत्र्यांसाठी गांधीजींनी अहिंसेचा अवलंब केला. या कायद्याविरोधात लढतानाही अहिंसेचा अवलंब करा. आंदोलनादरम्यान तुमच्या दिशेने दगड आला, तर प्रत्युत्तर न देता संविधानाला ढाल म्हणून पुढे करा. देश हेगडेवार, गोवळवलकरांच्या नाही तर, गांधीजी, आंबेडकरांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने मुंब्र्यातील शंकर मंदिर परीसरात पहिला एसआरए प्रकल्प राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंब्र्यातील मतदारांसाठी कातडीचे जोडे केले तरी कमी पडतील, परंतु आता राज्यातील नागरीकांसाठीही काम करायचे आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनी आपल्याला बेडीत न अडकवता ती सैल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋता आव्हाड यांचाही सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव सय्यद अली अशरफ, पक्षाचे मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शिमम खान, नगरसेवक अशरफ पठाण, बाबाजी पाटील, नगरसेविका अनिता किणे, आशरीन राऊत आदी उपस्थित होते.