हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतंय - जितेंद्र आव्हाड 

By अजित मांडके | Published: December 14, 2022 06:23 PM2022-12-14T18:23:33+5:302022-12-14T18:24:02+5:30

हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतं अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.  

 Jitendra Awhad criticized that this government is working to strengthen the caste-class system | हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतंय - जितेंद्र आव्हाड 

हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतंय - जितेंद्र आव्हाड 

Next

ठाणे : आंतरजातीय आणि आंतरधर्मिय विवाह करण्यापूर्वी सरकारला कळवायचे. मग, सरकार मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा करणार, असे परित्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकाची चर्चा करीत असताना सदरचे परिपत्रक हे संविधान विरोधी आणि मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणारे आहे. नशीब अजून सरकार हे सांगत नाही की आम्ही कुंडल्या जमवून बघू आणि मग त्यानंतर होकार किंवा नकार कळवू. हे सरकार आहे कि विवाह नोंदणी कार्यालय? असा सवाल करीत हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ,आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहांची माहिती आधी सरकारला कळवायची; त्यानंतर सरकारी पॅनल मुलांच्या पालकांशी चर्चा करेल, अशा आशयाचा एक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या निर्णयावर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली. डॉ. आव्हाड म्हणाले की, या सरकारला वेड लागले आहे, असे मला वाटते. पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास ज्यांना माहित आहे. त्यांना हे माहित असले पाहिजे की, महात्मा फुले यांनी यशवंत नामक  ब्राम्हण मुलगा दत्तक घेतला. शाहू महाराजांनी आपल्या घरातील पहिले लग्न एका धनगराच्या घरात केले. बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी पत्नी या ब्राम्हण होत्या. वर्णव्यवस्थेच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळल्यानंतर या महाराष्ट्रात अनेक आंतरजातीय विवाह झाले आहेत. 

आपले स्वत:चे आंतरजातीय विहाह आहे. पण, आंतराजातीय विवाह करणार असाल तर तुम्हाला ते सरकारला कळवावे लागेल, ही कोणती पद्धत आहे. सरकारला का कळवायचे? आम्ही सज्ञान आहोत ना? जर 18 वे वर्ष आम्हाला सज्ञान घोषीत करणार असाल तर आम्ही तुम्हाला का कळवायचे? या परिपत्रकामध्ये असेही म्हटलेय की सरकार मुलीच्या पालकांशी चर्चा करणार; कदाचित मुलांचे आपल्या मातापित्याशी नसेल पटणार! ही मुले आपल्या पालकांच्या मनाविरुद्ध लग्न करणार असतील; पण, त्याची माहिती घेणारे तुम्ही कोण? बर्‍याचदा आयुष्यभर मुलीशी तिचे पालक बोलत नाहीत. पण, मुलीचा संसार चांगला चालू असतो ना? संसार नावाची जी गोष्ट आहे ती मोडकळीस आणायची आहे का? आता ब्राम्हणांनी ब्राम्हणांसोबत; क्षत्रियांनी क्षत्रियांसोबत आणि शूद्रांनी शूद्रांसोबत लग्न करायची व्यवस्था करुन वर्णव्यवस्था लादण्याचा प्रयत्न करीत आहात काय? आंतरधर्मिय विवाह होणार असतील; तर, त्या दोघांच्या घरी पोहचून त्यांना धमकावयाचे का, मंगलपरभात लोढा यांना महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती काय माहित आहे? हा पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी करण्याचा हा डाव आहे. 1927 ला बाबासाहेबांनी जाळलेली मनुस्मृती मागच्या दाराने हे सरकार आत आणतंय. हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतेय. 

लव्ह जिहाद बाबत पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की, लव्ह जिहाद वगैरे सर्व खोटे आहेत. घटस्फोट कुठे होत नाहीत? एकच समाज असा आहे की तो म्हणजे ख्रिश्चन! तिथे विलगतेला परवानगीच नाही; बायबलमध्ये तसे लिहिलेय. जेव्हा तुम्ही धर्माबद्दल बोलता ना, तेव्हा त्या त्या धर्मग्रंथांचा अभ्यास करा. त्यामध्ये काय करुन ठेवलेय ते पहा. येशूने सांगितले असे त्यांचे म्हणणे आहे. ते येशूच्या सूचनांचा अवलंब करतात. आपण दुसर्‍या धर्मांकडून काही शिकायचे नाही. आपला धर्म श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी नको ते धंदे सुरु करायचे, असा प्रकार सुरु असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

 

Web Title:  Jitendra Awhad criticized that this government is working to strengthen the caste-class system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.