जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील काँग्रेस संपवली; आनंद परांजपे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 08:12 AM2024-03-15T08:12:22+5:302024-03-15T08:13:36+5:30
ठाणे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला एकही तिकीट आव्हाड यांनी दिले नसल्याकडे परांजपे यांनी लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात काँग्रेस संपवली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. ठाणे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला एकही तिकीट आव्हाड यांनी दिले नसल्याकडे परांजपे यांनी लक्ष वेधले.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी येणार आहे. या दौऱ्याबाबत आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच आव्हाड यांनी यात्रेचा मार्ग बदलून कळवा-मुंब्र्यातून यात्रा नेली, यावर शिंदे यांनी आक्षेप घेतला.
आता परांजपे यांनी शिंदे यांची री ओढत आव्हाड यांना लक्ष्य केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रश्न सोडविण्यासाठी पहाटेपासून देवगिरी बंगल्यावर रांग लावतात. पण, त्यांना सकाळी लवकर उठायची सवय नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लोकप्रियतेची कल्पना नसेल, असा टोला परांजपे यांनी लगावला.
आव्हाड यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना २०१९ पर्यंत विरोध केला. आनंद दिघे यांचा दुस्वास केला. मुंब्रा येथील शाखा पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर जितेंद्र आव्हाड होते. कळव्याची शिवसेनेची शाखा व खारिगाव नाका येथील शाखा आव्हाड यांच्यामुळे तुटली, असा आरोप परांजपे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याने वाद मिटला
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे हे पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत. त्याबद्दल आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी तटकरे यांना आश्वासित केले आहे की, शिवतारे यांना बोलावून योग्य ती समज देऊ. यामुळे या विषयावर पडदा पडला आहे.