Jitendra Awhad: एसीमुळे प्रवासी गुदमरुन मरण्याची भीती, आव्हाडांचा रेल्वे प्रशासनाला इशारा
By जितेंद्र कालेकर | Published: August 28, 2022 09:03 PM2022-08-28T21:03:44+5:302022-08-28T21:04:23+5:30
कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रवाशांशी संवाद साधला
ठाणे : साध्या उपनगरी रेल्वेमध्ये (लोकल) सुमारे ६ हजार प्रवासी एकाचवेळी प्रवास करतात. तर, एसी (वातानुकूलित) लोकलमध्ये इतके प्रवासी बसूच शकत नाहीत. ते गुदमरण्याची भीती आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये एसी लोकल चालवू नका. त्याचबरोबर मध्य रेल्वेचा पारसिक बोगद्यातील आवाज हा १७५ डेसीबलपेक्षा अधिक आहे. हा आवाज थांबला नाहीतर येथून जाणारी मेल एक्सप्रेस अडविली जाईल, असा इशाराच राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे आणि राज्याच्या गृहखात्याला प्रवाशांच्या बैठकीमध्ये रविवारी दिला.
कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रवाशांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गर्दीच्या वेळी एसी लोकल नकाेच. साध्या लोकलसह एसी लोकल चालविणार असाल तर तेही एकवेळेस मान्य होईल. पण साध्या लोकल काढून त्याजागी एसी लोकल चालविणार असाल तर ते मान्य होणार नाही. एसी लोकल फलाटावर उभी राहिल्यावर पाच हजारापैकी चार हजार प्रवासी स्थानकात तसेच उभे राहतात. अंबरनाथ फास्ट लोकलही अशीच अचानक बंद केली. मग त्याऐवजी साध्या जादा लोकल सुरु करा. संतप्त प्रवासी फक्त एक दिवस चालत रेल्वे ट्रॅकवरुन जातील. तेंव्हा काय कराल? असा सवालही त्यांनी केला.
रेल्वेचा १७५ डेसिबलचा आवाज बंद व्हावा
पारसिकचा बोगदा येथून पूर्वी मेल एक्सप्रेस जात होत्या. त्या अचानक धीम्या नविन मार्गावर आणल्या आहेत. त्यांचा आवाज १७५ डेसिबलपेक्षा अधिक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे रात्री १० वाजता ४५ डेसीबलपेक्षा आवाज नको. मग सर्वोच्च न्यायालयाने यातून रेल्वेला सवलत दिली आहे का? असा सवाल त्यांनी राज्य शासनासह रेल्वे पोलिसांना केला. कळव्यात अनेक इमारतींना तडे गेले आहेत. रात्री १० ते पहाटे २.३० च्या सुमारासही गाडया जातात. एखादी इमारत जर गाडयांच्या धावण्याने कमकुवत झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल करीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्याकडे तक्रर करीत रेल्वेला याची नोटीस बजावण्याचा आग्रह त्यांनी रेल्वे प्रवांशांसमोर धरला. यावेळी उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनीही या प्रवाशांवर लादलेल्या एसी लोकल बंद करण्याची मागणी केली. मुंब्रा प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी ए. आर. पठाण यांनी मुंब्रा आणि कळव्यामध्ये सेमी फास्ट गाडयांना थांबा देण्याची मागणी केली. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांच्यासह सिद्धेश देसाई, प्रतिभा बांगर, प्रणाली मोहिते प्रवाशांनीही अशाच तीव्र भावना व्यक्त केल्या.
तिकीट दर कसे परवडेल
दोनशे रुपये एका दिवसाचे तिकीट आणि दोनशे रुपयांचा एक महिन्यांचा पास कसे परवडेल? एसीच्या एका लोकलमधून केवळ ६०० तर साध्या ट्रेनमधून सहा हजार प्रवासी प्रवास करतात. साध्या लोकलचा दोनशे तर एसीचा महिन्याचा पास १८०० रुपये हे कसे परवडणार असा सवालही यावेळी आव्हाड यांच्यासह प्रवाशांनी केला.