मते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही- जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 10:28 PM2022-03-13T22:28:18+5:302022-03-13T22:28:50+5:30
पाण्याच्या विषयावर कधीच राजकारण केले नाही. करीतही नाही. पण पाण्याच्या टाकीसाठी निधी जागा आपण मिळविल्यानंतर त्याचे श्रेय जर कोणी केवळ महापालिकेत आपली सत्ता आहे, म्हणून घेणार असेल तर जनता अशा बाबींवर विश्वास ठेवत नसते,
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पाण्याच्या विषयावर कधीच राजकारण केले नाही. करीतही नाही. पण पाण्याच्या टाकीसाठी निधी जागा आपण मिळविल्यानंतर त्याचे श्रेय जर कोणी केवळ महापालिकेत आपली सत्ता आहे, म्हणून घेणार असेल तर जनता अशा बाबींवर विश्वास ठेवत नसते, असा हल्लाबोल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला.
कळव्यातील वाघोबानगरमधील कारगिल परिसरात २० लाख लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्धाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते रविवारी रात्री झाले. येत्या महिन्याभरात या परिसरातील सर्व भागांमध्ये पाण्याचा पुरवठा होईल, अशी ग्वाही आव्हाड यांनी यावेळी दिली.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच या टाकीसाठी जागा देणारे आदिवासी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह पालिकेचे अभियंता गोसावी यांचेही आव्हाड यांनी विशेष आभार मानले. वाघोबानगरवासियांनी पहिल्याच वेळी आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणले. त्यामुळेच या भागातील विकास कामांकडे लक्ष देणे आपले कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. या भागातील रहिवाशांसाठी पाणी, रस्ते अशा सर्वच मुलभूत सुविधा पुरविल्या जातील. त्यामुळे तुमच्या घरांच्या किंमती निश्चितच वाढतील, परंतू आपली घरे विकून पुन्हा दूसरीकडे झोपडया बांधू नका, असा कळकळीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तुमच्याकडे येत्या महिनाभरात पाणी येईल, फक्त आशिर्वादाचा हात असू द्या, असे आवाहन त्यांनी केले.
केवळ विकासाचे काम
मते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणोरडे राजकारण आपण कधीच केले नाही. परंतू, असे प्रकार भास्करनगर, पौंडपाडा भागात घडतात. पाण्याचे वॉल्व बंद करुन आणि शौचालयांना लॉक लावण्याचे राजकारण कधीच केले नाही. लोक घाबरुन मते देतीलही परंतू, त्यांचे आशिर्वाद मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले. आता असे व्हॉल्व बंद होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या शिवसैनिकांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
शिवसेनेचे शाखाप्रमुख अंकुश गुरव, अक्षय अंकुश गुरव, उपशाखाप्रमुख रामआवतार यादव, संजय चौगुले, इस्माईल हक, दिलीप रजक, राहूल सिंग, संदीप शर्मा, नितेश गौड, राहूल दुबे आणि दीपक राजभर आणि राजेश राजभर या शिवसैनिकांनी आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
गणेश भगत यांचा विशेष सत्कार
पाण्याच्या टाकीसाठी जागा देणारे गणेश भगत यांचाही यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.