आव्हाडच सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे, आनंद परांजपे यांची टीका
By अजित मांडके | Published: April 8, 2024 02:31 PM2024-04-08T14:31:35+5:302024-04-08T14:34:00+5:30
Lok Sabha Election 2024 : रविवारी आव्हाडांनी केलेल्या टीकेनंतर परांजपे यांनी सोमवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेत प्रतिहल्ला चढविला आहे.
ठाणे : सूयार्जी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर केली होती. त्याला अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर करीत जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे असून ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले असल्याचा आरोप केला आहे.
रविवारी आव्हाडांनी केलेल्या टीकेनंतर परांजपे यांनी सोमवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेत प्रतिहल्ला चढविला आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करीत असल्याचे सांगत, शरद पवारांना त्यांनी विचारावे की २०१४ चा निकाल येण्याआधीच भाजपाला बिनशर्थ पाठिंबा द्यायला कोणी सांगितला? पहाटेचा शपथविधी कोणाच्या आर्शिवादाने झाला, राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठविली गेली, २०२२ मध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होत असल्याने त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या हे सगळे प्रश्न आव्हाडांनी शरद पवारांना विचारावे असा सल्लाही त्यांनी दिला.
राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर अजित पवार, सुनील तटकरे आणि भुजबळ यांचे मोठे योगदान होते, असेही ते म्हणाले. त्यातही भाऊ बहिणीच्या नात्यावर आव्हाड यांनी बोलू नये, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची फक्त राजकीय भूमिका वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्यावर आव्हाड यांनी न बोललेच बरे असा सल्लाही परांजपे यांनी दिला. आव्हाड यांना आधी मी इतिहासकार किंवा डॉक्टर म्हणायचे पण त्यांना आता नकलाकार म्हणण्याची वेळ आली असल्याची टीकाही त्यांनी केली.
गणेश नाईक आणि वसंत डावखरे यांचा कायम आव्हाड यांनी दुस्वास केला. शरद पवार यांना कायम खोटे नाटे सांगण्याचे काम आव्हाड यांनी केले. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी संपविण्याचे मोठे कामही त्यांनी केले असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. एकनाथ खडसे हे आता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांना विचारले का? साहेबांनी आपल्याला काय कमी केले होते. भिवंडीची जागा हट्टापाई घेतली असून आता त्या जागेवर आपला उमेदवार कसा निवडून येईल याची काळजी आव्हाड यांनी करावी, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी सदिच्छाही त्यांनी यावेळी दिली.