जितेंद्र आव्हाडांनी घेतली कल्पिता पिंपळेंची भेट!, महापालिका प्रशासनावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 12:19 PM2021-09-02T12:19:55+5:302021-09-02T12:32:05+5:30
Jitendra Awhad : प्रशासन कमकुवत असते असे उद्गार काढून जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले.
ठाणे : महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी रात्री त्यांची भेट घेत, माध्यमांशी बोलताना, ठाणे महापालिका प्रशासन कमकुवत असल्याचा आरोप करत त्या प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच त्यांनी ठाणेकर नागरिकांनाही जबाबदार मानले आहे. तर हा हल्ला दुदैवी असून पिंपळे यांचे दैवत चांगले तसेच आईवडिलांच्या आशीर्वादामुळे त्या बचावल्या. याशिवाय ही घटना ठाण्याला भूषणावह नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कासारवडवली येथे सोमवारी सायंकाळी महापालिका अधिकारी पिंपळे यांच्या जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून हाताची दोन बोटही कापली गेली आहे. तसेच त्यांचा सुरक्षारक्षक पालवे यांचेही एक बोट कापले आहे. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाण्यातील आमदार व राजकीय नेते मंडळींसह विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बुधवारी रात्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
त्यानंतर गृहनिर्माण मंत्र्यांनी बोलताना, एवढी मुजोरी कोणाचीही चालू देता कामा नये. प्रशासनापेक्षा कोणी मोठा आहे, अशी भावना जेव्हा निर्माण होते. तेव्हा ते प्रशासन कमकुवत असते असे उद्गार काढून जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले. तसेच पुढे बोलताना, प्रशासनाचा एक दरारा तसेच दहशत पाहिजेत. ज्या दिवशी दहशत आणि दरारा संपतो त्यावेळी अशा घटना घडतात असे म्हणून प्रशासनावर टीका केली. तसेच फेरीवल्यांविरोधात ओरडणाऱ्या ठाणेकरांचे ही कान टोचले. त्या फेरीवाल्यांकडे रांगा लावून कोण उभे असते, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
याशिवाय, तुम्हीच चालत नसल्याने घरातून उतरल्यावर फेरीवाल्याकडून घेतले की गेले घरी अशी अवस्था ठाणेकरांनी स्वतःची केली आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्याचबरोबर नुसते महापालिकेला जबाबदार न धरता, त्याबाबत समाजाची ही तितकीच जबाबदारी असल्याचे ही आव्हाड म्हटले. या भेटी दरम्यान आव्हाड यांच्यासोबत माजी नगरसेवक अमित सरय्या आदी पदाधिकारी उपस्थित होते.