झाडांच्या कत्तलीसाठीच आरेमध्ये ‘पोलीसराज’ - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:10 AM2019-10-07T04:10:54+5:302019-10-07T04:15:04+5:30
एखादी भीषण दंगल झाल्यानंतर जसे तणावपूर्ण वातावरण असते, तसे वातावरण शनिवारी आरेच्या जंगलामध्ये होते.
ठाणे : मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील हजारो झाडांची कत्तल करता यावी, यासाठी आरेमध्ये संचारबंदी जाहीर करून हा परिसर पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे. त्यामुळे आरेत पोलीसराज निर्माण झाल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केला.
एखादी भीषण दंगल झाल्यानंतर जसे तणावपूर्ण वातावरण असते, तसे वातावरण शनिवारी आरेच्या जंगलामध्ये होते. संचारबंदी लागू झालेली, जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, येणाऱ्या-जाणाऱ्यांची ओळखपत्रांसह तपासणी करत प्रत्येकाची कसून चौकशी पोलीस करीत होते. कॉलेजमधून परत आलेल्या एका मुलीजवळ आधार कार्ड नव्हते. त्यामुळे तिचे आदिवासी वडील आपल्या पाड्यातून तिचे आधार कार्ड घेऊन येईपर्यंत पोलिसांनी तिला अडकवून ठेवले होते. फरक इतकाच की, आरेमध्ये दंगल-हत्याकांड सरकारच करत होते. झाडांची बेसुमार कत्तल चालली होती आणि ती थांबविण्यासाठी जे कोणी पुढे येतील, त्यांना अडविण्यासाठी हा पोलीस बंदोबस्त होता. सदासर्वकाळ पर्यावरणाचे गोडवे गाणारे सरकार स्वत: पर्यावरणाचा विध्वंस करत होते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
आव्हाड शनिवारी दुपारी ३ वा.च्या सुमारास आरेमध्ये पोहोचले. तेव्हा काही केल्या पोलीस आपल्याला आरे जंगलात प्रवेश देणार नाहीत, याची खात्री त्यांना पटली. आमदारकीचा तोरा मिरविण्यात अर्थ नव्हता. पोलीस ‘वरून’ आलेल्या हुकुमाला बांधिल होते. नशिबाने त्या वेळी जंगलातल्या आदिवासीपाड्यात राहणारी एक महिला त्यांच्या मदतीला धावली. जंगलातील चोरवाटांची तिला खडा अन् खडा माहिती होती. पोलिसांची नजर चुकवून आडवळणाच्या वाटेने तिच्या मदतीने आव्हाड यांनी जंगलात प्रवेश केला. काही अंतर दुचाकीने पार केले. जिथे झाडं कापली जात होती, तिथपर्यंतचे साधारण नऊ किलोमीटरचे अंतर त्यांनी पायी कापले. ही वृक्षछाटणी स्वत:च्या डोळ्यांनी पाहायची, असा निर्धार त्यांनी केला होता. त्यामुळे एक प्रकारचा गनिमी कावा करत आरेमध्ये प्रवेश करण्याचा एक चित्तथरारक अनुभव आपण घेतल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.
‘प्राणवायू देणारी झाडे निष्प्राण झाली’
तिथे पोहोचल्यानंतर जे दृश्य दिसले, ते हृदयद्रावक होते. कंत्राटदारांचे शेकडो मजूर त्यांच्या यांत्रिक करवतींनी सपासप झाडे छाटत होते. साधारणपणे दोन मिनिटांत ७०/८० वर्षांचे झाड भुईसपाट होत होते. पर्यावरणाचा विध्वंस इतक्या वेगाने होऊ शकतो, यावर विश्वास बसत नव्हता. आम्ही जमतील तितके व्हिडीओ काढायचा प्रयत्न केला. एका झाडाच्या कलेवरापाशी उभा राहिलो, तेव्हा डोळ्यांत पाणी आले. मुंबई, ठाण्याला अथकपणे प्राणवायू देणारा तो जीव स्वत:च निष्प्राण होऊन पडला होता. अशा अनेक प्रेतांचा खच तिथे पडला होता. तेवढ्यात पोलिसांना सुगावा लागला. मला आणि माझ्या सहकाºयांना त्यांनी दंडाला धरून बाहेर काढल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
‘...तर मुंबईचे गोरखपूर होईल’
नवरात्रात दांडिया खेळावा इतक्या सहजपणे सरकारने आरेतील झाडांवर करवती चालविल्या. आॅक्सिजनच्या अभावाने गोरखपूरमध्ये शेकडो बालकांचा बळी गेला. अडीच हजार झाडांची कत्तल करून महाराष्ट्र सरकार आता मुंबईचे गोरखपूर करायच्या वाटेवर आहे, असे या घटनेचे वर्णन आव्हाड यांनी केले.