जितेंद्र आव्हाड राज्याचा चेहरा बदलतील, शरद पवार यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 12:07 AM2020-01-28T00:07:28+5:302020-01-28T00:07:54+5:30
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ज्यांना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेले आणि स्वत:चे कर्तृत्व असलेले लोक मंत्री झाले.
ठाणे : कर्तृत्ववान लोकांना साथ दिली तर समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास वेळ लागत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी हे दाखवून दिले आहे. आज कळव्यात दिसणारे विस्तीर्ण रस्ते, येथील विकासकामे ही त्याची पावती आहे. आव्हाने स्वीकारली तर लोक कधीच विसरत नाहीत. त्यांनी आव्हाने स्वीकारल्यामुळेच ज्या भागात प्रतिकूल परिस्थिती होती, तिथेच त्यांना अधिक मताधिक्य मिळाले. लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकते. अशीच साथ त्यांना द्या; तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल, महाराष्ट्राला देशामध्ये प्रथम
क्र मांकावर नेण्यासाठी मोठे योगदान देईल, अशी मला खात्री आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कौतुक केले.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ज्यांना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेले आणि स्वत:चे कर्तृत्व असलेले लोक मंत्री झाले. येथे प्रकर्षाने सांगावेसे वाटते की, ठाणेकर भाग्यवान आहेत की, त्यांना असे दोन मंत्री मिळाले आहेत; ज्यांच्या कामांतून महाराष्ट्र बदलेल. आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण आणि एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास या खात्यांमुळे सबंध महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला परवडणारी घरे मिळतील, याची आपणाला खात्री असल्याचे पवार म्हणाले.
जिथे कर्तृत्व असते, त्या कर्तृत्वाला प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली, तर समाजातील प्रश्नांची सोडवणूक करणारे नेतृत्व उभे राहू शकते. आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिले आहे. मागील अनेक वर्षे ठाण्यातच नव्हे, तर ठाण्याच्या बाहेर सबंध महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात जे योग्य असेल, त्याचा यांनी नेहमीच पुरस्कार करून स्वत:चे एक स्थानही प्रस्थापित केले आहे. एक लोकप्रतिनिधी जागृत असला आणि त्याला जनतेने साथ दिली तर काय होऊ शकते, हे तुम्ही कळवा-मुंब्य्रामध्ये जाऊन पाहा, असे आम्ही नव्या कार्यकर्त्यांना सांगत असतो. म्हणून, तुम्हा सर्वांची साथ त्यांच्यासोबत अशीच ठेवा.
मी तुम्हाला खात्री देतो की, हा तुमचा प्रतिनिधी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील लोकांच्या जीवनात बदल करण्यातही यशस्वी होईल. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. त्याचा तुम्हा सर्वांना सार्थ अभिमान असेल, याचीही मला खात्री आहे, असे ते यावेळी पुढे म्हणाले.
नव्या पिढीला घडवा
शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत सांगितले की, मुंबईत आल्यानंतर आपण तरु णांच्या चळवळीत काम करीत होतो. त्यावेळी एका मंचावर माझे भाषण संपल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी मला बोलावून घेतले आणि विचारपूस केली. त्यांनीच मला मोठे केले. तेव्हापासून मी मोठा होत गेलो.
मला आव्हाड आणि शिंदे यांना या ठिकाणी सांगावेसे वाटते की, नव्या पिढीतील लोकांना घडविण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यांना संधी द्या; त्यांच्यातील कर्तृत्व ओळखून महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांना सोबत घ्या. तुम्ही नक्कीच महाराष्ट्राला प्रथमस्थानी नेऊन ठेवाल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.