जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपकडून दहन

By अजित मांडके | Published: May 30, 2024 04:03 PM2024-05-30T16:03:40+5:302024-05-30T16:04:47+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला.

Jitendra Awhad's effigy burnt by BJP in Thane | जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपकडून दहन

जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपकडून दहन

ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला. तसेच त्यांच्या छायाचित्राला काळे फासले. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनातून आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात ठाण्यातील कोर्ट नाका, कळवा, भीमनगर आणि कोपरीत झालेल्या आंदोलनात आव्हाडांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच चितळसर पोलिस ठाणे व वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, उत्तराखंडमधील ऋषीकेश येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करीत जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, वृषाली वाघुले-भोसले यांनी आव्हाडांवर कारवाईची मागणी केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार, ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघात आंदोलन करून आव्हाडांचा धिक्कार करण्यात आला. ठाण्यातील कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात आमदार संजय केळकर यांच्यासह ठाणे शहर विधानसभा निवडणूकप्रमुख सुभाष काळे, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर, ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथे झालेल्या आंदोलनात आव्हाडांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. त्यानंतर भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष आनंद बनकर यांनी वर्तकनगर पोलिसांना निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाचे सहप्रभारी भरत चव्हाण, माजी नगरसेवक सुरेश कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. त्यानंतर सुरेश कांबळे यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर कळवा येथे भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे यांनी आंदोलन करून आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

Web Title: Jitendra Awhad's effigy burnt by BJP in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.