जितेंद्र आव्हाडांचा स्त्युत्य निर्णय, गोरगरिबांच्या उपचारासाठी उचललं मोठं पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 02:21 PM2020-03-31T14:21:36+5:302020-03-31T14:45:39+5:30
'माझ्याकडून फूल न फुलाची पाकळी; छोटासा हातभार लागला तर खूप बरे होईल'
ठाणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत स्त्युत्य असा निर्णय घेतला आहे. स्वत:सह चालक आणि स्वीय सहाय्यकांना शासनाकडून देण्यात येणारे वर्षभराचे वेतन त्यांनी गोरगरिबांच्या कल्याणसाठी शासनाच्या तिजोरीत जमा करण्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत देशामध्ये अशा पद्धतीने आपले वेतन सरकारी तिजोरीमध्ये जमा करणारे ते पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले आहेत.
"मी आज काही तरी ऐकले की महाराष्ट्राच्या आमदारांच्या वेतनामध्ये कपात केली जाणार आहे. मी माझ्यावतीने जाहीर करतो की, माझा वर्षभराचा पगार मला देऊ नये, तो सरकारी तिजोरीत जमा करुन गोरगरीबांच्या आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वापरावा", असे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
"माझ्यासाठी सरकारकडून जे काही अर्थसाह्य होते; त्यामध्ये माझ्या चालकाचा पगार, माझ्या स्वीय सहाय्यकाचा पगार, माझा पगार मला कुठेही नको. हे सर्व सरकारी तिजोरीमध्ये जमा करावा, माझ्याकडून फूल न फुलाची पाकळी; छोटासा हातभार लागला तर खूप बरे होईल", असेही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे.