जितेंद्र आव्हाडांच्या रिपोर्टवरून पक्षात मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 02:15 AM2020-04-15T02:15:36+5:302020-04-15T02:15:48+5:30
ठाणेकरांची चिंता वाढली : मिलिंद पाटील, आनंद परांजपेंची परस्परविरोधी मते
ठाणे : आपला कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: दिली. मात्र, आव्हाड यांचा पहिला रिपोर्ट हा पॉझिटिव्ह होता, असा धक्कादायक खुलासा त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला. तर दुसरीकडे राष्टÑवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मात्र आव्हाड यांचा पहिला रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याचा दावा केला. त्यामुळे यातील नेमके खरे कोण बोलतोय असा प्रश्न ठाणेकरांना पडला असून नेत्यांमधील या मतभेदांमुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
ठाण्यात सोमवारी एकाच दिवशी ३० कोरोनाचे रुग्ण आढळले. यामध्ये आव्हाड यांचे ५ सुरक्षारक्षक, आचारी २ कार्यकर्ते, काही अधिकारी अशा तब्बल १४ जणांचा समावेश होता. मात्र, आपला रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत समाजसेवेच्या माध्यमातून कळवा, मुंब्य्रात अनेक नागरिकांना मदत केली असून त्यांच्या पोटाची खळगी भरण्याचे काम केले असल्याने दक्षता म्हणून घरातच क्वॉरंटाइन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण स्वखर्चातून ८० हून अधिक जणांची कोरोना चाचणी करून घेतली आहे. त्यातील काहींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दक्षता म्हणून मी स्वत:च घरात क्वॉरंटाइन केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्याच पक्षातील माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक मिलिंद पाटील यांनी आव्हाड यांचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक खुलासा करून चार दिवसांनी केलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचेही मंगळवारी सांगितले. मात्र, आव्हाड यांनी आधीपासूनच कोरोनावर मात करण्यासाठी औषधे सुरूकेली होती. तसेच ते पथ्यदेखील पाळत होते. त्यामुळेच ते यातून लवकर बाहेर पडल्याचा दावाही त्यांनी केला.
दुसरीकडे पाटील यांनी केलेला खुलासा चुकीचा असल्याचा दावा शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. आव्हाड यांची एकदाच टेस्ट झाली असून ती निगेटिव्ह आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाटील यांच्याकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. एकाच पक्षातील दोघा नेत्यांनी असे दोन तर्क लावल्याने आता आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती किंवा नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या असून नमके खरे कोण बोलत आहे, असाही संशय आता निर्माण झाला असून ठाणेकरांची चिंता मात्र वाढली आहे.