गणेश नाईकांनी पक्षाची वाट लावली, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 02:06 PM2019-07-30T14:06:56+5:302019-07-30T14:07:58+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टीका केली आहे.
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टीका केली आहे. गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली. नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असे मी वारंवार सांगत होतो, मात्र पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले, अखेरीस आज मी ज्याची भीती व्यक्त केली होती तेच घडत आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
भाजपाच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शरसंधान केले. ते म्हणाले, ''गणेश नाईक 2014 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार होते. जेव्हा शरद पवार यांचे ऑपरेशन सुरू होते. तेव्हा गणेश नाईक हे गुप्त बैठका घेण्यात गुंतले होते. त्यांच्या या हालचालींविषयी मी पक्षाला वारंवार सुचित केले. मात्र पक्षाने माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले.''
गणेश नाईक यांनी पक्षवाढीसाठी काहीही योगदान दिले नाही, असा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला. राज्यात सत्ता असतानाही कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मिरा-भायंदर मध्ये चांगली ताकद असतानाही राष्ट्रवादी वाढली नाही. गणेश नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असे मी वारंवार सांगत होतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता इथे जी फाटाफूट होत आहे त्यामागे गणेश नाईक यांचा हात असेल,'' असेही आव्हाड म्हणाले.
कुठलाही पक्ष घरात बसून वाढत नाही, आता सरंजामशाही गेली, अशा टोलाही आव्हाड यांनी लगावला. गणेश नाईक यांनी नवी मुंबईत विकास केला हे मान्य मात्र सर्व सत्ता नाईक कुटुंबाकडे केंद्रित केली. गणेश नाईक, संजीव नाईक, सागर नाईक, तुकाराम नाईक अनेकांना सत्तापदे मिळाली, असेही आव्हाड यांनी सांगितले.
आज भाजपाच्या नेत्या मंदा म्हात्रे आम्ही गणेश नाईक यांचे नेतृत्व स्वीकारणार नाही, असे उघडपणे सांगत आहेत. मग आता गणेश नाईक यांचा स्वाभिमान कुठे गेला, असा सवालही अव्हाड यांनी केला.