जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक कदम यांची आत्महत्या; आरोपी नसल्याचे ठेवले स्टेटस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:06 AM2023-03-30T10:06:50+5:302023-03-30T10:07:58+5:30
चौकशीचा ससेमिरा पुन्हा मागे लागल्यामुळे ते तणावाखाली असल्याचे बोलले जाते.
ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक पोलिस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा दरम्यान रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजता घडली. अभियंता अनंत करमुसे प्रकरणात ठाणे पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू होती. आता या आत्महत्या प्रकरणाचा ठाणे रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. कदम यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
मुंबई पोलिसांच्या विशेष सुरक्षा दलात (एसपीयू) नेमणूक झालेले कदम यांचा आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाद’ बंगल्यावर करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात आरोपी म्हणून समावेश होता. या प्रकरणात अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलिसांकडून पुन्हा त्यांची चौकशी करण्यात येत होती. चौकशीचा ससेमिरा पुन्हा मागे लागल्यामुळे ते तणावाखाली असल्याचे बोलले जाते.
बुधवारी सकाळी दिवा ते रोहा जाणाऱ्या मेमू रेल्वेखाली निळजे ते तळोजादरम्यान त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांना तातडीने दिवा येथील बालाजी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याकडे मोबाईल आणि काही पैसे आढळल्याचे ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले. वैभव यांच्या मागे पत्नी, आई, वडील, भाऊ आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृतदेहाचे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या रायगड जिल्ह्यातील धारणा कॅम्प येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. वैभव यांच्या निधनाने चांगला कबड्डीपटू गमावल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
आरोपी नसल्याचे ठेवले स्टेट्स
वैभव यांनी मृत्यूपूर्वी आपल्या मोबाईलवर स्टेट्स ठेवले आहे. यामध्ये ‘मी खरंच चांगला नवरा, बाप, मुलगा आणि भाऊ होऊ शकलो नाही. साक्षी, स्वर मला माफ कर. आई, पप्पा मला माफ करा. एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. पण यामध्ये कोणाचा दोष नाही. मी डिप्रेशनमुळे हा निर्णय घेत आहे.’ शेवटी ‘आपण आरोपी नाही, असे त्यांनी पोलिस आणि मीडियाला उल्लेखून म्हटले आहे.