जेजे, केईएम रुग्णालयांच्या धर्तीवर हवे पदव्युत्तर प्रशिक्षण
By admin | Published: January 29, 2017 03:12 AM2017-01-29T03:12:18+5:302017-01-29T03:12:18+5:30
छोटे-मोठे रुग्णालय सुरु करताना महापालिका प्रशासनाकडून घ्यायच्या विविध परवानग्या म्हणजे एक डोकेदुखी आहे. अचानक नियमांमध्ये बदल करताना डॉक्टर असोसिएशनशी
- पंकज रोडेकर, ठाणे
छोटे-मोठे रुग्णालय सुरु करताना महापालिका प्रशासनाकडून घ्यायच्या विविध परवानग्या म्हणजे एक डोकेदुखी आहे. अचानक नियमांमध्ये बदल करताना डॉक्टर असोसिएशनशी चर्चा केली जात नाही. परिणामी परवानगीसाठी मारावे लागणारे हेलपाटे कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने ‘एक खिडकी योजना’ सुरु करावी तसेच ठाण्यातील वैद्यकीय सेवा सर्वोत्तम असली तरी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मुंबईतील जे.जे. आणि केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर पदव्युत्तर (प्रशिक्षण)
अभ्यासक्रम सुरु करावा, अशी अपेक्षा ठाण्यातील वैद्यकीय सेवेतील तज्ज्ञांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांच्या नाहीतर रुग्णांच्याही समस्यांचा विचार करावा लागणार आहे. रुग्णांचा विचार केल्यास ठाण्यात महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज मेडिकल कॉलेज आणि ठाणे जिल्हा ( सिव्हील ) शासकीय रुग्णालय आहे. येथे उपचार होतात. पण, मुंबईतील जे.जे किंवा केईएम रुग्णालयात जसे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु असल्याने तेथे चोवीस तास डॉक्टरांची फौज तैनात आहे तशी ती ठाण्यात हा अभ्यासक्रम सुरु झाल्यास उभी राहील. त्यामुळे ठाणेकरांनाही आणखी चांगली सेवा मिळू शकेल. शहरात छोटे-मोठे रुग्णालय सुरु करण्यासाठी रजिस्ट्रेशन, नोंदणी फी, अग्निशमन दलाची परवानगी आदी परवानग्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. तसेच त्यांचे दरही जास्त आहेत. सर्व परवानग्या एका ठिकाणी मिळाव्या, असे मत,ठाण्यातील ईएनटी सर्जन डॉ. राहुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये लोकप्रतिनिधी आणि मीडिया महत्वाची भूमिका घेऊ शकतो. हल्लेखोरांच्या दृष्टीकोनात बदल झाल्यास डॉक्टरवरील हल्ले नक्कीच कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर रुग्णालय/ दवाखाना सुरु करताना, लागणाऱ्या परवानगी म्हणजे कटकट आहे. पाणी, घनकचरा आदी करांचे दर अधिक आहेत. याचा फटका रुग्णांना बसतो. त्यामुळे या सर्व डोईजड होणाऱ्या बाबी तत्काळ मार्गी लावणे गरजेचे आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप टाळावा. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांनी उपचारार्थ दाखल असलेल्या इतर रुग्णांचा तसेच त्यांच्या नातेवाईकांना विचार करावा, अशी भावना डॉ. मेधा भावे यांनी व्यक्त केली.
डॉक्टरांबद्दल मीडियाचा गैरसमज
डॉ. मेधा भावे म्हणाल्या की, डॉक्टर आरामखुर्चीत बसून पैसे काढत असल्याचा मीडियाचा गैरसमज झाला आहे. नवनव्या रोगांवर उपचार करताना, आम्हालाही समजून घेणे अपेक्षित आहे. ठाण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून ठाणेकरांना अधिक चांगली वैद्यकीय सेवा कशी देता येतील, याचा विचार झाला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे डॉक्टरांबद्दलचे मत सामान्यांनी बदलले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.