बीएआरसीत नोकरीचे अमिष दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 09:29 PM2020-01-07T21:29:03+5:302020-01-07T21:33:46+5:30
मुंबईतील बीएआरसीमध्ये मुलाला नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून ठाण्यातील अमृत मंडले आणि सांगलीतील रविराज चव्हाण यांच्यासह पाच जणांच्या टोळीने कोल्हापूर (कळंबा) येथील तानाजी देसाई या लष्कारातील माजी सैनिकाकडून चार लाख ७५ हजारांची रक्कम घेऊन गंडा घातला. विशषे म्हणजे बनावट बीएआरसीचे बनावट लेटरपॅड बनवून या भामटयांनी उमेदवाराची वैद्यकीय तपासणीही करुन परीक्षाही घेतली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये अर्थात बीएआरसीमध्ये मुलाला नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून अमृत मंडले (रा. सावरकरनगर, ठाणे) आणि रविराज चव्हाण (रा. वायफळे, तासगाव, जि. सांगली) यांच्यासह पाच जणांनी कोल्हापूर (कळंबा) येथील तानाजी देसाई या लष्कारातील माजी सैनिकाकडून चार लाख ७५ हजारांची रक्कम घेतली. गेल्या वर्षभरात त्यांच्या मुलाला नोकरीला न लावता पैसेही परत न केल्याने अखेर त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अशोक शिंदे यांच्याशी २०१६ मध्ये मीरज रेल्वेस्थानकावर कोल्हापुरातील देसाई यांची भेट झाली होती. याच ओळखीतून पुढे शिंदे यांनी आपण आर्मी भरतीची अकादमी चालवित असून आपली मुंबईत ओळख आहे. त्यामुळे मानखुर्द येथील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये तुमच्या मुलाला ओळखीने नोकरीला लावतो, असे त्यांनी अमिष दाखविले. त्यासाठी तुम्हाला आधी काही पैसे द्यावे लागतील, असेही सांगितले. त्यानंतर ठाणे येथून अमृत मंडले याने शिंदे यांच्या मार्फतीने रविराज चव्हाण यांचा ई मेल आयडी दिला. त्यावर त्यांच्या मुलाची कागदपत्रे पाठविण्यास सांगितले. पुढे चव्हाण यांनी शिंदे यांच्या मार्फतीने निरोप दिला की, त्यांचा मुलगा इंद्रजित यास भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी मिळू शकते. त्यासाठी सहा लाख रुपये द्यावे लागतील. पण वैद्यकीय तपासणीसाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील. २८ मे २०१८ रोजी त्याची वैद्यकीय तपासणीही केली. त्यासाठी त्यांनी रविराज यांच्याकडे ५० हजारांची रक्कमही दिली. विशेष म्हणजे या तपासणीसाठी रविराज याने भाभा अणुसंशोधन केंद्राचे नाव असलेले लेटरपॅडही आणले होते. या तपासणीनंतर मंडले यांच्या बँक खात्यावर त्यांनी रक्कम पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे मंडलेंच्या खात्यावर १ जून २०१८ रोजी दोन लाख रुपये आणि ५ जून रोजी २०१८ रोजी एक लाख २५ हजारांची रक्कम त्यांनी पाठविली. उर्वरित रक्कम घेण्यासाठी स्वत: मंडले, रविराज चव्हाण, विलास चव्हाण तसेच रविराज यांचे चुलते संपत चव्हाण आणि तानाजी चव्हाण असे पाच जण ठाण्यात पैसे घेण्यासाठी आले. त्यावेळी एक लाखांची रक्कम घेतल्यानंतर मुलाचा नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे परिक्षेचे हॉल तिकीट देऊन ८ जुलै २०१९ रोजी त्याची परीक्षाही घेतली. त्यात तो नापास झाल्याचे भासविले. तरीही त्याचे काम करण्यात होईल, असे सांगून या पाच जणांनी गेल्या वर्षभरात चार लाख ७५ हजारांची रक्कम घेतली. पण मुलाला कुठे नोकरीही लागली नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाही. याबाबतची त्यांनी आधी कोल्हापूरच्या राजावाडी पोलीस ठाण्यात ३ जानेवारी रोजी तक्रार दिली. हीच तक्रार आता ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात ६ जानेवारी २०२० रोजी वर्ग करण्यात आली आहे.