उल्हासनगरातील पाणी टंचाईवर संयुक्त समिती, महापालिका उभारणार स्वतःचे पाणी स्रोत
By सदानंद नाईक | Published: August 25, 2023 04:57 PM2023-08-25T16:57:53+5:302023-08-25T16:58:54+5:30
तसेच शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी किनारे स्वतःचे पाणी स्त्रोत निर्माण करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.
उल्हासनगर : शहरातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मुंबई दालनात झालेल्या बैठकीत महापालिका, एमआयडीसी व महावितरण यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी किनारे स्वतःचे पाणी स्त्रोत निर्माण करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसी पाणी सोडले, त्याच वेळी वीज गुल झाल्यास, शहरातील विविध पाणी टंचाई निर्माण होत असल्याचे उघड झाले. शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी उधोगमंत्री उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरवारी एक बैठक पार पाडली. एमआयडीसीच्या माध्यमांतून शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा करणे आणि स्वतंत्र पाण्याचे स्रोत उभारण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी एमआयडीसी, महावितरण आणि उल्हासनगर महापालिका प्रशासन यांची एकत्रितरित्या महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात यावी. याबाबत बैठकीत उद्योगमंत्री महोदयांनी आदेश दिले. पाणी पुरवठ्याचे वितरण वेळी वीज पुरवठा खंडित होऊ नये. याकडे लक्ष देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेच्या टप्पा क्रं-२ अंतर्गत महापालिका स्वतःचे पाण्याचे स्रोत उभारणार आहे. यासाठी महापालिकेने सविस्तर प्रस्ताव यापूर्वीच शासन दरबारी पाठविला असल्याची माहिती महापालिका पाणी पुरावठा विभागाने पाठविली आहे.