लग्नाच्या वाढदिवसादिनी ठाण्यातील जोशी दाम्पत्याचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 23, 2020 04:06 PM2020-05-23T16:06:25+5:302020-05-23T16:37:02+5:30
ठाण्यातील जोशी दाम्पत्या मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे.
ठाणे : लहान असताना दृष्टिहीन मुलांना मिळणारी वागणूक मनाला बोचली होती. या मुलांना डोळे असते तर त्यांनी आपल्यासारखेच जग पाहिले असते आणि त्यांना कोणी हिणवले देखील नसते. त्यातूनच नेत्रदान करण्याचा मनात विचार आला. नेत्रदान करायचे हे मनाशी पक्के केले आणि लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत ठाण्यातील जोशी दाम्पत्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला.
ठाण्यात लुईस वाडी येथे राहणारे तुषार जोशी आणि तनुश्री जोशी या दाम्पत्यांनी आपल्या लग्नाच्या 14 व्या वाढदिवसानिमित्त मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. तनुश्री या लहान असताना त्यांच्या परिसरात राहणाऱ्या दृष्टिहीन मुलाला त्याच्या मित्राकडून होणारी टिंगल पाहिली होती. खेळत असताना त्या मुलाला त्याचे मित्र तो बरोबर असताना तो चुकीचा असल्याचे दाखवत. तो दृष्टिहीन असल्याने त्याला ती मुले चिडवत असत. हे पाहून तनुश्री याना प्रचंड वाईट वाटले होते. एकेवेळी ट्रेन मधून प्रवास करताना दृष्टीहीन मुलगी आणि तिची दृष्टिहीन आई त्यांच्या नजरेस पडली. त्यावेळी त्या मुलीची आई नवीन 50 रुपयांची न कशी ओळखायची हे त्या मुलीला शिकवत होती आणि मुलीला ते ओळखणे जड जात होते अशा अनेक घटना मनाला टोचत असल्याने पती तुषार यांच्याशी चर्चा करून या दोघांनीही मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. नेत्र ही देवाची देणगी आहे आपण एका दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान केले तर ती व्यक्ती उर्वरित आयुष्य नव्याने जगू शकते म्हणूनच हा संकल्प केला आणि इतरांनीही तो करावा असे जोशी दाम्पत्यांनी सांगितले. नेत्रदान विषयी अनेक शंका तनुश्री यांच्या मनात होत्या त्या सर्व शंकांचे निरसन नेत्रदान प्रतिष्ठानच्या समन्वयक - समुपदेशक अश्विनी जोशी यांनी केले. नेत्रदान केल्यावर आपले नेत्र दृष्टिहीन व्यक्तीलाच मिळतात का ? नेत्रदान केल्यावर त्याची माहिती संपूर्ण कुटुंबाला मिळते का असे प्रश्न मला होते आणि त्याची समाधानकारक उत्तरे मिळल्यावरच आम्ही दोघांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला. लग्नाच्या वाढदिवस हा संकल्प करूनच साजरा केला. तसेच यानिमितातने कापूरबावडी येथील गोर गरिबांना सकाळ आणि संध्याकाळी जाऊन जेवण ही दिले असल्याचे तुषार यांनी सांगितले. हे दाम्पत्य आता इतरांनीही नेत्रदानासाठी पुढे यावे यासाठी जनजागृती करीत आहे. देहदनाविषयी योग्य मार्गदर्शन मिळाले तर देहदानही करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नेत्रदानाचा ऑनलाइन अर्ज हे दाम्पत्य भरणार आहेत. हा संकल्प माझ्या 12 वर्षाच्या मुलीला सांगितलं तेव्हा ती खूप खुश झाली. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे असे ती म्हणल्याचे तनुश्री यांनी सांगितले. नेत्रदानविषयी जनजागृती होत असली तरी हव्या तेवढ्या प्रमाणात लोक पुढे येत नाही. आज कित्येक दृष्टिहीन मुले डोळे मिळण्याची वाट पाहत आहेत अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली. ज्यांना नेत्रदान करायचे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन ही त्यांनी केले. नेत्रदानाचा संकल्प केल्याची माहिती सोशल मीडियावर टाकल्यानंतर या दाम्पत्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.