जोशी रूग्णालयाच्या हस्तांतरात विघ्ने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:17 AM2018-06-30T01:17:24+5:302018-06-30T01:17:27+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या हस्तांतराची अंतिम कार्यवाही २४ जूनला पार पडली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला नुकतीच सुरूवात झाली
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या हस्तांतराची अंतिम कार्यवाही २४ जूनला पार पडली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला नुकतीच सुरूवात झाली. परंतु, या रूग्णालयाच्या जागेची मालकी राज्य सरकारऐवजी अद्याप पालिकेच्याच नावे असल्याने हस्तांतराच्या कार्यवाहीला ब्रेक लागला आहे.
९ आॅगस्ट २०१६ मध्ये रूग्णालय हस्तांतराच्या प्रारुप करारनाम्याला मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हस्तांतरणावर शिक्कामोर्तब झाले. कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी सरकारने पालिका व जिल्हा आरोग्य उपसंचालकांना सहा महिन्यांचा अवधी दिला. परंतु, त्यात रुग्णालयातील अपूर्ण कामांसह पालिका कर्मचाºयांचा सरकारी सेवेतील समावेश, जागेची मालकी, आवश्यक मनुष्यबळासाठी नवीन पदनिर्मितीचा खोडा निर्माण झाल्याने हस्तांतर दीड वर्षे रखडले. पालिका सेवेतील ३६ कर्मचाºयांचा सरकारी सेवेतील समावेशानंतर ३६५ पदांच्या नवीन निर्मितीला मान्यता दिल्याचा आदेश काढला. यानंतर तब्बल चार महिन्यानंतर कराराला मान्यता देत हस्तांतराची कार्यवाही पूर्ण झाली. हस्तांतराची कार्यवाही पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले असतानाच त्यात जागेच्या मालकीची अडचण निर्माण झाली. चार मजली रुग्णालयातील तीन मजल्यापर्यंतचे काम पूर्ण झाले असून चौथ्या मजल्यावरील काम अपूर्ण आहे. येथील कामासाठी पालिकेला ५ ते १० कोटी खर्च करावे लागणार आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी पालिकेने १६ कोटी खर्च केले आहेत. रूग्णालयात शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे यांच्यासह चार वैद्यकीय अधिकारी, ३ अधिपरिचारीका व २ लिपीक नुकतेच रुजू झाले आहेत. परंतु, जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर राज्य सरकारचे नावच आलेले नाही.