ध्वनिप्रदूषणाने जोशी रुग्णालयातील रुग्ण त्रस्त; मैदानात होतात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:28 PM2020-01-03T23:28:48+5:302020-01-03T23:28:51+5:30
रहिवाशीही आले मेटाकुटीला, यंत्रणेची डोळेझाक, नगरसेवकही बसले गप्प
भाईंदर : येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील रुग्णांसह परिसरातील रहिवासी येथील मैदानातील बेकायदा कार्यक्रम-समारंभातील रोजच्या ध्वनिप्रदूषणाने मेटाकुटीला आले आहेत. रुग्णालय व शाळा हे शांतता क्षेत्रात मोडत असूनही येथे दिवसरात्र वर्दळ सुरू असते. स्थानिक नगरसेवकांसह महापालिका व पोलिसांकडून कारवाई होत नसतानाच या भागात राहणारे महापालिकेचे अनेक अधिकारी, नगरसेवकही चिडीचूप असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेचे २०० खाटांचे जोशी रुग्णालय असून सध्या त्याचे व्यवस्थापन सरकार पाहत आहे. याच ठिकाणी शवागार आणि शवविच्छेदन केंद्र तसेच परिसरात दोन शाळा आहेत. रुग्णालय, शाळा शांतता क्षेत्रात मोडत असल्याने या परिसरात ध्वनिक्षेपणास मनाई आहे. आजूबाजूचा परिसर निवासी इमारती, संकुलांचा आहे. तसे असताना या परिसरात काही मोकळे भूखंड हे विविध कार्यक्रम, लग्न आदी समारंभांसाठी भाड्याने दिले जातात. त्यासाठी काहींनी तर भलेमोठे मंडप कायमस्वरूपी उभारले आहेत.
महापालिकेची कोणतीच परवानगी न घेता तसेच महासभेच्या ठरावानुसार शुल्क न भरता येथे सर्रास विविध कार्यक्रम, समारंभ होतात. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत मोठ्या कर्णकर्कश आवाजात कानठळ्या बसवणारे ध्वनिक्षेपक यंत्रणांचा वापर केला जातो. अगदी मध्यरात्रीनंतर वा पहाटेच्यावेळीही फटाके फोडणे, बॅण्ड वाजवणे, ध्वनिक्षेपक लावण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. कार्यक्रमांसाठी येणारी वाहने भररस्त्यातच लावली जात असल्याने वाहतूककोंडी नित्याचीच झालेली आहे.
या ध्वनिप्रदूषणामुळे जोशी रुग्णालयातील रुग्णांसह परिसरातील कस्तुरी गार्डन, बेकरी गल्ली, ठाकूर गल्ली, मॅक्सस मॉलमागील परिसरातील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. झोप लागणे अशक्य होते. कधी कानठळ्या बसवणारा आवाज सुरू होईल आणि झोपमोड होईल, याचा नेम नसतो. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान बाळ, विद्यार्थी आदींना तर या ध्वनिप्रदूषणामुळे त्रास होतोच, पण नोकरदार महिला, पुरुषांनाही हा जाच नकोसा झाला आहे. खिडक्या कडेकोट बंद करून तर काहींना कानांत बोळे घालून झोपावे लागते.
रुग्णालय, शाळा व निवासी परिसर असूनही बेकायदा कार्यक्रमांच्या माध्यमातून चालणाऱ्या या ध्वनिप्रदूषणाविरोधात नगरसेवक, महापालिका, पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. खुल्या मैदानातील कार्यक्रम-समारंभांमधून मोठे उत्पन्न मिळत असल्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
या प्रभागात चार नगरसेवक असून त्यात भाजपचे डॉ. सुशील अग्रवाल, सुरेश खंडेलवाल व वैशाली रकवी, तर शिवसेना नगरसेविका कॅटलीन परेरा यांचा समावेश आहे. या परिसरात भाजप नगरसेविका दीपाली मोकाशी, पालिकेचे अधिकारी संजय दोंदे, गोविंद परब, शरद बेलवटे आदी राहत असताना ते देखील याकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहेत.
कार्यक्रमामुळे परिसरात होते वाहतूककोंडी
याप्रकरणी स्थानिक रहिवासी प्रकाश लिमये यांनी महापालिका व पोलिसांना लेखी तक्रार करून ठोस कारवाईची मागणी केली आहे. शांतता क्षेत्राचे तसेच ध्वनिप्रदूषण कायदा व ध्वनिमर्यादेचे काटेकोर पालन केले जावे. या ठिकाणी कार्यक्रमांसाठी येणाºया गाड्यांमुळे कोंडी होत असल्याने अशा वाहनांवर कारवाई करावी. बेकायदा झालेले मंडप व कार्यक्रम बंद करावेत, अशी मागणी लिमये यांनी रहिवाशांच्या वतीने केली आहे.