गणेश दर्शन स्पर्धेत जोशी मित्रमंडळ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:05 AM2017-08-09T06:05:22+5:302017-08-09T06:05:26+5:30
शिवसेना डोंबिवली शहर आणि शिवसंस्कृती प्रतिष्ठानने २०१६ मध्ये घेतलेल्या गणेश दर्शन स्पर्धेत पश्चिमेतील जोशी मित्रमंडळाने प्रथम क्रमांक व ३१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
डोंबिवली : शिवसेना डोंबिवली शहर आणि शिवसंस्कृती प्रतिष्ठानने २०१६ मध्ये घेतलेल्या गणेश दर्शन स्पर्धेत पश्चिमेतील जोशी मित्रमंडळाने प्रथम क्रमांक व ३१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. या मंडळाने आईच्या दुधाचे महत्त्व पटवून देणारा दृकश्राव्य माहितीपट दाखवून समाजप्रबोधन केले.
शिवसेना शहरप्रमुख व प्रतिष्ठानचे संस्थापक भाऊसाहेब चौधरी यांनी २०१६ मध्ये घेतलेल्या गणेश दर्शन स्पर्धेत ५१ मंडळे सहभागी झाली होती. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच आदित्य मंगल कार्यालयात झाला. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, व्यावसायिक मधुकर चक्रदेव, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ, तात्या माने, भाऊसाहेब चौधरी, ललित शाईवाले, निषाद पवार आदी उपस्थित होते.
शिवनेरी गणेशोत्सव मित्र मंडळाने या स्पर्धेत २१ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक तर गणेश मंदिर संस्थानाने ११ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळवले. या दोन्ही मंडळांनी अनुक्रमे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व पटवून देणारे देखावे साकारले होते. या शिवाय एकता मित्र मंडळाने अमरनाथ येथील बर्फाचे शिवलिंग, एकनाथ म्हात्रे नगरच्या मंडळाने मेकिंग इंडिया साकारले. जिजाईनगर आणि फाटकवाडी येथील मंडळांनीही आकर्षक देखावा साकारत जागृती केली. या मंडळांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट मूर्तीसाठी आजदे येथील जाणता राजा या गणेशोत्सव मंडळाला मान देण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सर्वोकृष्ट मूर्तीकार विजेत्या मंडळांनाही रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतन दुर्वे यांनी केले.
संगीत रजनी ठरली खास आकर्षण
गणेश दर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी संगीत रजनीचा कार्यक्रमही झाला. त्यात पंडित वसंत आजगावकर, प्रख्यात गायक प्रभंजन मराठे, अश्विनी धारगाळकर, निलेश निगुडकर, कश्मिरा राईलकर, प्रीती हिरेमठ, डॉ. प्रशांत सुवर्णा, आसावरी पुराणिक ,अक्षय काळे, व्यंकटेश कुलकर्णी आदींनी संगीत साथ दिली. या संगीत रजनीचे सूत्रसंचालन प्राची देवस्थळी यांनी केले.
पर्यावरणस्नेही आरास हवी - शिंदे
शिवसेनेच्या माध्यमातून मंगरूळ येथे एक लाख वृक्ष ५ जुलैला लावण्यात आली. तोच पर्यावरणाचा संकल्प आपण पुढे नेऊ. यंदा ही सर्व मंडळांनी पर्यावरण जपणारे देखावे साकारावेत. सगळ््यांनी त्यांचा आनंद लुटावा, असे आवाहन डॉ. शिंदे केले.