जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात; सर्वत्र सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:39 PM2020-01-02T23:39:50+5:302020-01-02T23:39:54+5:30

दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला, रूग्णांना होत आहे त्रास

Joshi threatens hospital health; Wastewater everywhere | जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात; सर्वत्र सांडपाणी

जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात; सर्वत्र सांडपाणी

Next

मीरा रोड / भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या व सध्या सरकारकडे तीन महिन्यांसाठी नियोजन दिलेल्या भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाचेच आरोग्य बिघडले आहे. विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या या रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या पाइपातून सांडपाणी वाहत असून ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ साचले आहे. ही टाकीही उघडी असून सांडपाणी व दुर्गंधीमुळे रुग्णांसह कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली वैद्यकीय सेवा मिळावी आणि खाजगी रुग्णालयाच्या मनमानी लूटमारीतून सुटका मिळावी म्हणून तत्कालीन जनता दलाचे नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाच्या आदेशाने महापालिका आणि सत्ताधाऱ्यांना रुग्णालय बांधून ते सुरू करणे भाग पाडले. २०० खाटांचे हे रुग्णालय असले, तरी पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे आजही शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग, आवश्यक डॉक्टर व यंत्रणाच उपलब्ध झाली नाही. यातूनच रुग्ण दगावण्याचे तसेच रेल्वेत बाळंत होण्याचे प्रकार घडले. याशिवाय, विविध प्रकरणांनी रुग्णालय नेहमीच वादग्रस्त राहिले.
रुग्णालय सक्षमपणे चालवण्याऐवजी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ते सरकारच्या माथी मारण्याचा खटाटोप सतत केला. तर, सरकारकडूनही पालिकेने आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही म्हणून रुग्णालय घेतले नाही. अखेर, तीन महिन्यांत पालिका सर्व प्रलंबित कामे करून देईल, या अटींवर केवळ व्यवस्थापन सरकाच्या आरोग्य विभागाने घेतले आहे. तर, बाकी सर्व सुविधा, कर्मचारी पुरवणे, देखभाल आदी जबाबदारी पालिकेचीच आहे. परंतु, पालिकेच्या ढिसाळ आणि उदासीन कारभारामुळे जोशी रुग्णालयाच्या व्यथा काही संपता संपत नाहीत.

रुग्णालयाच्या स्वच्छतागृहाचे पाइप गळत असल्याने रुग्णालय परिसरात सांडपाणी साचले आहे. सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच, रुग्णालयाच्या पिण्याच्या पाण्याची टाकी येथे आहे. या टाकीचे झाकण तर नेहमीच अर्धवट उघडे असते. त्याभोवती सांडपाण्याचे तळे साचलेले आहे.

प्रशासनाची डोळेझाक
सांडपाण्यामुळे दुर्गंधी व डासांच्या त्रासाने रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचारी, येणारे नागरिक व परिसरातील रहिवाशीही ग्रासले आहेत. त्यातच, पाण्याची टाकीही सांडपाण्याच्या विळख्यात आल्याने रुग्ण आदींना होणारा पाणीपुरवठाही सुरक्षित राहिलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून सांडपाण्याची गळती, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असतानाही महापालिका प्रशासनाने याकडे डोळेझाक चालवली आहे.

Web Title: Joshi threatens hospital health; Wastewater everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.