भिवंडीत जुन्या बातमीच्या रागातून पत्रकाराला मारहाण
By नितीन पंडित | Published: January 2, 2024 08:07 PM2024-01-02T20:07:04+5:302024-01-02T20:07:27+5:30
Bhiwandi News: बातमी दिल्याच्या रागातून पत्रकाराला बेदम मारहाण झाल्याची घटना भिवंडीतील कोनगाव येथे घडली आहे. याप्रकरणी पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्याच्या ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नितीन पंडित
भिवंडी - बातमी दिल्याच्या रागातून पत्रकाराला बेदम मारहाण झाल्याची घटना भिवंडीतील कोनगाव येथे घडली आहे. याप्रकरणी पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्याच्या ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थ माणिकराव कांबळे वय ५६ वर्ष असे मारहाण झालेल्या पत्रकाराचे नाव आहे.तर आरीस खलील शेख व त्याचे इतर तीन साथीदार असे मारहाण प्रकरणी गुन्ह दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपी आरीस याची आई नुरनिशा खलील शेख यांच्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी कांबळे यांनी २०१६ मध्ये बातमी प्रसिद्ध केली होती.यामुळे एमएमआरडीएने सदरचे अनधिकृत बांधकाम तोडले होते.त्यावेळी नुरनिशा अंसारी यांच्या कुटुंबीयांनी कांबळे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना मारहाण केली होती.त्यावेळी देखील आरोपींवर गुन्हा दखल करण्यात आला होता.त्यांनतर हे आरोपी सतत पत्रकार सिद्धार्थ कांबळे व त्यांच्या परिवाराला तसेच साक्षीदारांना देखील त्रास देत आहेत.कांबळे यांच्या पाणीपुरवठा होत असलेल्या बोरवेल आणि पाणी साठवून ठेवणाऱ्या पाण्याच्या टाकीत आरोपींनी घाण व कचरा टाकून जेसीबीच्या साह्याने बळजबरीने टाकी तोडून टाकत कांबळे यांचा पाणीपुरवठा देखील खंडित केला होता.
शुक्रवारी रात्री सिद्धार्थ कांबळे हे जेवण करून कोनगाव येथील ड्रीम कॉम्प्लेक्स या रहिवासी संकुलातील आपल्या इमारतीच्याखाली चालत होते. यावेळी नूरनिशा शेख यांचा मुलगा आरीस शेख व त्याच्या तीन साथीदारांनी पत्रकार सिद्धार्थ यांना अडवून शिवीगाळ केली.आधी आमचे बांधकाम तोडले आणि आता आमच्या विरोधात तक्रार करतोस थांब तुला सोडत नाही असे म्हणून आरीस शेख व त्याच्या तीन साथीदारांनी पत्रकार सिद्धार्थ कांबळे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कांबळे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
शहरातील पत्रकारांवरील हल्ले कदापी सहन केले जाणार नसून पत्रकारांना योग्य ते सहकार्य भिवंडी पोलिसांकडून करण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.