सरपंच ते खासदारकीचा प्रवास, राष्ट्रवादीपासून झाली कारकिर्दीस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 01:22 AM2019-05-29T01:22:17+5:302019-05-29T01:22:58+5:30

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

The journey of the sarpanch to the MP, the beginning of the career of the NCP | सरपंच ते खासदारकीचा प्रवास, राष्ट्रवादीपासून झाली कारकिर्दीस सुरुवात

सरपंच ते खासदारकीचा प्रवास, राष्ट्रवादीपासून झाली कारकिर्दीस सुरुवात

Next

कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. कपिल पाटील यांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने त्यांना राजकीय वारसा आपल्या वडिलांपासून लाभला. याची चुणूक त्यांनी कॉलेज जीवनातदेखील निवडणूक लढवून दाखवली होती. मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खरी सुरुवात सन १९८८ पासून झाली.
कपिल पाटील हे १९८८ साली प्रथम दिवे-अंजूर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून येऊन सरपंच झाले. चार वर्षे ते सरपंच होते. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी घेऊन सन १९९२ मध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवली. सन २००२ मध्ये काल्हेर-अंजूर गटातून निवडणूक लढवून ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. या सर्व निवडणुका त्यांनी राष्ट्रवादी पक्षातर्फे लढवल्याने ते ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. २००५-०७ दरम्यान उपाध्यक्ष असताना त्यांनी शिक्षण विभागात आपला ठसा उमटवला आणि याच काळात त्यांच्यातील उत्तम वक्ता घडला. त्यानंतर, २००९ मध्ये ते ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. हीच कारकीर्द त्यांना खासदारकीच्या निवडणुकीत यश देण्यास कारणीभूत ठरली. त्यातच, ते काही वर्षे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन होते. मात्र, २०१४ मध्ये जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचे वारे पाहून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली आणि मोदीलाटेचा फायदा घेत निवडून आले. कार्यकर्त्यांची टीम आणि विकासकामांचा पाठपुरावा करण्याची धमक ठेवत त्यांनी आपली प्रतिमा बनवली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाविरोधात वातावरण असताना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा विश्वास संपादन करून त्यांनी अभूतपूर्व विजय मिळवला.
>भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पाऊल
भिवंडी लोकसभा क्षेत्रातील खाजगी व सार्वजनिक वाहतुकीसाठी तसेच प्रवासी वाहतुकीसाठी प्रयत्नशील असून त्यासाठी विविध उपाययोजना व उपक्रम हाती घेतले आहेत.
खासदार होताच त्यांनी भिवंडीतील उड्डाणपुलांना चालना दिली. तर, एमएमआरडीएच्या माध्यमांतून शहरात ५२ आरसीसी रस्ते बनवून महानगरपालिकेचा भार हलका केला. जकात बंद झाल्याने पालिका डबघाईला आली असताना शहरातील मागरिकांना सोयीसुविधा मिळण्यासाठी डांबरी रस्त्यांऐवजी आरसीसी रस्ते बनवले. त्यामुळे पालिकेच्या खर्चात करोडो रूपयांची बचत झाली आहे.
>शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हल : साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या सर्वांतून समाजाची अभिरुची घडत असते आणि सुसंस्कृत समाज तयार होत असतो, त्यासाठी त्यांनी मतदारसंघातील उत्सवांना पुढाकार देऊन या उत्सवांना भेटी देत त्यांचा उत्साह वाढवला. कल्याण पश्चिममध्ये त्यांनी दिवाळी पहाट हा कार्यक्रम सन २०१४ पासून सुरू केला. तर, भिवंडीसह मतदारसंघातील साजºया होणाºया शिवजयंती उत्सवांना आवर्जून भेटी दिल्या. उत्सव ही परंपरा मानत त्यांनी सर्व जातीधर्मांच्या उत्सवांना प्रोत्साहन दिले.
>लोकसेवेचा वसा :
वडिलांकडून मिळवलेला लोकसेवेचा वसा ग्रामपंचायतीपासून ते खासदार बनण्यापर्यंत कायम ठेवला असून भिवंडी लोकसभा मतदारसंघाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा वसा त्यांनी अंगीकारला आहे. त्यामधून पॉवरलूम, गोदामहब अद्ययावत सरकारी रूग्णालये आणि इतर सोयींकडे त्यांचे जास्त लक्ष असून ते त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यामधून मोठा रोजगार या मतदारसंघात निर्माण होणार आहे.

Web Title: The journey of the sarpanch to the MP, the beginning of the career of the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.