राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये जम्बो भरती, मे अखेर प्रक्रिया होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:50 AM2018-03-18T00:50:19+5:302018-03-18T00:50:19+5:30
राज्यातील ३३ जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गांतील पदांची जम्बो भरती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. आॅनलाइन पद्धतीने होणारी ही भरती प्रक्रिया मेअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : राज्यातील ३३ जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गांतील पदांची जम्बो भरती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. आॅनलाइन पद्धतीने होणारी ही भरती प्रक्रिया मेअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या हजारो पदांच्या भरतीच्या जबाबदारीचे यजमानपद कोकण विभागीय आयुक्तांकडे असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राज्य शासनाच्या नियंत्रणात जिल्हा परिषदांची ही जम्बो आॅनलाइन भरती प्रक्रिया प्रथमच होत आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना रिक्त पदांची माहिती १९ मार्चपर्यंत देण्याची सक्ती आहे. पण या अल्पमुदतीऐवजी त्यात सुमारे आठवडाभराची वाढ करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. अभियंते, विस्तार अधिकारी, कनिष्ठ-वरिष्ठ साहाय्यक, लिपिक, शिपाई आदी हजारो पदांची ही भरती एकाच वेळी एकाच दिवशी जिल्हा परिषदांमध्ये आॅनलाइन करण्याचा मानस आहे. याची जबाबदारी कोकण विभागीय आयुक्तालयाला दिल्याचे समजते. यात ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
तत्पूर्वी सर्व जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या जाती-जमातींसह अन्यही प्रवर्गनिहाय पदांच्या माहिती संकलनाचे काम सुरू आहे. अहवाल आठवडाभरात राज्य शासनास सुपुर्द होणार आहे. मे महिनाअखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. एकाच पदासाठी एकाच जिल्ह्यात एकाच दिवशी उमेदवारास आॅनलाइन परीक्षा द्यावी लागेल. यामुळे एकाच उमेदवाराची दोन जिल्ह्यांत निवड होण्याची समस्या उद्भवणार नाही. रिक्त जागाही राहणार नाही आणि भरती प्रक्रिया १०० टक्के निर्दोष होईल. यासाठी कोकण विभागीय आयुक्तालयाच्या नियंत्रणातील आस्थापनाचा दांडगा अनुभव असलेल्या अधिकाºयाचे कसब पणाला लागणार आहे.