फोटोसाठी नदीत उडी मारली अन् जीव गमावला; नेरळनजीकच्या पेज नदीमध्ये बुडून पर्यटकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 09:32 AM2023-12-23T09:32:46+5:302023-12-23T09:32:55+5:30
दोन दिवसांपूर्वी अंधेरी (मुंबई) परिसरातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी नेरळजवळील मिरचोली येथे पर्यटनासाठी आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : नेरळनजीकच्या मिरचोली गावातून वाहणाऱ्या पेज नदीमध्ये एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी नदीच्या प्रवाहात बुडालेल्या आदित्य मोरे या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नदीपात्रात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. पेज नदीमध्ये खडकावर आणि पाण्यात उड्या मारण्याचे छायाचित्र काढण्याच्या नादात या तरुणाचा नदीत तोल जाऊन बुडाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अधिक तपास सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी अंधेरी (मुंबई) परिसरातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी नेरळजवळील मिरचोली येथे पर्यटनासाठी आले होते.
खडकावर बसून तो छायाचित्र काढत होता...
दुपारी जेवणानंतर व्यवसायाने कला दिग्दर्शक असलेले सुकांत पाणीग्राही यांचा मुलगा सौजस याच्यासोबत पर्यटनासाठी आलेले गौतम, शुभम, यश, भूषण आणि आदित्य असे सर्व जण नेवाळी गावाच्या पेज नदीकिनारी फिरण्यासाठी गेले. आदित्य मोरे यास पोहता येत नसल्याने नदीमधील खडकावर बसून तो छायाचित्र काढत होता. नंतर त्याने लाईव्ह फोटोसाठी पाण्यात उडी मारली.
बोटी घेऊन तपास
आपले विशेष छायाचित्र काढण्यासाठी त्याने नदीच्या पाण्यात उडी मारली, तो दिसेनासा झाला. बुडालेल्या आदित्यचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, शोध न लागल्याने नेरळ पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक किसवे यांच्याकडून खोपोली येथील शोध पथकाला मदतीसाठी पाचारण केले. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत या पथकातील गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, राजेश पारथे, नीलेश कुढले, अमोल ठाकेकर, विशाल चवण, सौरभ घरात, महेश भोसले, प्रेम पाटील, संतोष मोर, मोहन पवार, भक्ती साठेलकर यांनी नदीमध्ये बोटी घेऊन तपास करण्याचा प्रयत्न केला.