पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामास आता जूनची डेडलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:00 AM2020-12-03T04:00:29+5:302020-12-03T04:00:36+5:30
ठाणे स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या पाडकामास लवकरच सुरुवात
ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकातील अतिरिक्त वाढणारा भार कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या कळवा-ऐरोली एलिव्हेटेड या रेल्वेमार्गाच्या दुसरा टप्प्यातील कामाची गती वाढवून प्रवाशांची गर्दी टाळण्याकरिता तसेच फेऱ्या वाढविण्यास आवश्यक पाचव्या व सहाव्या लाइनचे हे काम ३० जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले.
रेल्वेच्या विविध समस्यांबाबत प्रशासनास सूचना करण्यास रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या दालनात होणारी खासदारांची बैठक यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक खासदाराला त्यांच्या समस्या व सूचना मांडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वैयक्तिक वेळ देणे गरजेचे असल्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल व मध्य रेल्वेचे प्रबंधक शलभ गोयल तसेच एमआरव्हीसीचे चेअरमन रवी खुराना तसेच इतर खासदार उपस्थित होते.
ठाणे रेल्वेस्थानकातील मुंबई दिशेने असणाऱ्या पादचारी पुलाचे काम १० डिसेंबर रोजी व कल्याण दिशेस असणाऱ्या पादचारी पुलाचे काम १५ डिसेंबर रोजी सुरू करण्यात येईल, असे सांगितले. मध्य रेल्वेमार्गावरील १५ डब्यांच्या लोकलफेऱ्या, महिला विशेष लोकल, सरकते जिने, नवीन तिकीट खिडकी, शौचालयांची संख्या वाढविण्याची मागणी केली.१६ एप्रिल १८५३ रोजी ठाणे ते बोरीबंदर अशी भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली होती. त्या ठाणे रेल्वेस्थानकातील धोकादायक इमारत पाडून नव्या इमारतीसाठी निधीची उपलब्धता केली असून ती पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने लवकरच याचे काम सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले.
ठाण्याजवळ पूर्व द्रुतगती महामार्गावरील अरुंद रेल्वेपुलावरील नवीन गर्डर टाकण्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू होऊन त्यावरील मार्गिकेचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून देऊ. तसेच कोपरी सॅटिस २ च्या इमारतीच्या आराखड्यास इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ॲथॉरिटीकडून लवकरच मान्यता मिळवून देऊ, असे आश्वासनही दिले.
लोकग्राम पूल, चिखलोली स्थानक प्रकल्पांना गती
कल्याण : पूर्वेला जोडणाऱ्या लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. सध्याचा जुना पूल दोन महिन्यांत पाडून लगेचच नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. जुना पूल पाडण्यासाठी कंत्राटदार नेमला असून हे काम सुरू असतानाच नवीन पुलाच्या बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सूचना मध्य रेल्वेने मान्य केली आहे. तसेच चिखलोली रेल्वेस्थानकासाठी जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेलाही गती मिळाली आहे.
लोकग्राम येथील पुलाच्या पाडकामाला लवकरच सुरुवात होऊन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. या पुलासाठी कल्याण-डोंबिवली मनपातर्फे लवकरच रेल्वेकडे ७८ कोटी रुपये जमा केले जातील, असेही शिंदे यांनी सांगितले. अंबरनाथ व बदलापूरदरम्यान चिखलोली स्थानकासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संयुक्त सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. आता अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली असून, काही अडचणी येत असल्याची माहिती बैठकीत रेल्वेने दिली असता त्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने एक बैठक घेण्याचे आश्वासन खासदारांनी दिले.
पारसिक येथून खाडीच्या दिशेने जाणाऱ्या एलिव्हेटेड मार्गिकांचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून महत्त्वाच्या गर्डरचे लाँचिंग पुढील महिन्यात होईल. कोपर, अंबरनाथ स्थानकांमधील होम प्लॅटफॉर्मचे काम प्रगतिपथावर आहे. कोपर येथील काम ३१ मार्चपर्यंत, तर अंबरनाथ येथील काम ३१ जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.