सार्वजनिक बांधकाम विभागाचा लाचखोर कनिष्ठ अभियंता गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:25 PM2019-09-23T23:25:24+5:302019-09-23T23:31:48+5:30
नवी मुंबईच्या कोपरखेैरणे येथील एका हॉटेलसाठी साउंडप्रूफचे प्रमाणपत्र देण्यासाठी ७० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता विनोद गंभीरे (३५) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे : ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता विनोद गंभीरे (३५) याला ७० हजारांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली. नवी मुंबईतील एका हॉटेलचालकाला साउंडप्रूफचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्याने लाच घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील एका हॉटेलसाठी साउंडप्रूफच्या प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी या हॉटेलचालकाने ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभाग क्रमांक-३ चा कनिष्ठ अभियंता गंभीरे याच्याशी संपर्क साधला होता. हे प्रमाणपत्र देण्यासाठी गंभीरे याने त्यांच्याकडे ८० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ७० हजारांची रक्कम देण्याचे ठरले. सौदा पक्का झाल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मण राठोड यांच्या पथकाने २३ सप्टेंबर रोजी सापळा लावून याबाबतची पडताळणी केली. तेव्हा दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या गेटसमोरील रस्त्यावरच ७० हजारांची रक्कम स्वीकारताना गंभीरेला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.