ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली द्वीपात्रीची जुगलबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:00 PM2018-10-01T16:00:43+5:302018-10-01T16:03:11+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर द्वीपात्रीची जुगलबंदी रंगली होती.
ठाणे : ठाण्याची सांस्कृतिक ओळख म्हणजेच अभिनय कट्टा. ३९६ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांना द्विपात्री अभिनयाची जुगलबंदी अनुभवयाला मिळाली. प्रेक्षक प्रतिनिधी मनीषा मूळे यांच्या हस्ते दिप्रज्वलन करून कट्ट्याची सुरुवात करण्यात आली.आशा राजदेरकर यांनी नवरा म्हणू नये आपला हि एकपात्री सादर केली.
कोणत्याही धंद्यात मार्केटिंग असेल तर आपण पुढे जाऊ शकतो हे नमूद करणारी द्विपात्री म्हणजे प्रोफेशनल भिकारी. एका सर्वसामान्य नोकरी करणाऱ्या तरुणापेक्षा ,एक तरुण भिकारी कशी आपली कमाई करतो हे विनोदी अंगाने मांडण्याचा प्रयत्न ओंकार मराठे व सहदेव साळकर या कट्ट्याच्या कलाकारांनी केला. राजन मयेकर व कुंदन भोसले यांनी बाप नंबरी और बेटा दस नंबरी ह्या द्विपात्रीतून पूजा सांगणाऱ्या ब्राह्मण बापाची व त्याचा धंदा वाढवावा म्हणून मुलगा एक पाऊल पुढे टाकत भिक्षुकीचा व्यवसाय कसा करतो हे हलक्याफुलक्या पद्धतीने मांडले. जंतर मंतर या हॉरर कॉमेडी द्विपात्रीच्या माध्यमातून सहदेव कोळंबकर व वैभव चव्हाण या जोडीने लोकांना हसत हसत घाबरवले सुद्धा. तसेच नवराबायकोची कमाल ,यमाची धम्माल या लघुनाटिकेतुन एका दारुड्या इसमाला स्वर्गात घेऊन जायला निघालेला यम त्या दारुड्या इसमाच्या व त्याच्या बायकोच्या कचाट्यात कसा सापडतो हे विनोदी अंगाने अर्जुन नाईक, प्रतिभा घाडगे , श्रीराम विधाटे व मोहन पानसरे यांनी सादर केले.या संपूर्ण कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले. आजपर्यंतचा संघर्षमय प्रवास केवळ कट्ट्याचे कलाकार, रसिक मायबाप, प्रसारमाध्यमं व अभिनय कट्ट्याच्या सर्वच हितचिंतकांमुळेच करू शकलो आणि लवकरच ४००व्या कट्ट्याचा इतिहास आपल्या सर्वांमुळेच अनुभवायला मिळेल असे आपले मत संचालक किरण नाकती यांनी व्यक्त केले.