मुंब्रा बायपाससह पूल दुरुस्तीचे काम लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:47 AM2018-08-07T02:47:14+5:302018-08-07T02:47:41+5:30
मुंब्रा पुलाची व बायपासच्या रस्त्याची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे.
ठाणे : मुंब्रा पुलाची व बायपासच्या रस्त्याची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही माहिती सोमवारी दिली. यामुळे त्यांनी अभियंत्यांवर तीव्र संताप व्यक्त करून यापुढे विलंब करू नका, अशी तंबी दिली.
कोणत्याही परिस्थितीत ही वेळ पाळली जावी, असे सांगून पालकमंत्र्यांनी सर्व पालिका हद्दीतील व ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे पॉलिमरसारखे तंत्रज्ञान, रेडिमिक्स वगैरेसारख्या पद्धतीने तातडीने बुजवावेत, पोलिसांना मदत करण्यासाठी १०० वाहतूक वॉर्डन एमएसआरडीसीने द्यावेत, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनीदेखील वाहतूककोंडी दूर करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीत मुंब्रा बायपासदुरु स्ती तसेच ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी परिसरात होणारी वाहतूककोंडी यावर विस्तृत चर्चा झाली.
सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेलचे अभियंता आर.एस. पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, १० सप्टेंबरपर्यंत पूल व बायपासची दुरु स्ती पूर्ण होईल. मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंब्रा रस्त्यावरील काही भाग खचला, त्यामुळे नवी समस्या निर्माण झाली. या रस्त्यालगत राहणाºया काही कुटुंबांना ठाणे पालिकेने तात्पुरती निवासव्यवस्था केली, पण ती कुटुंबे तिथून न गेल्याने दुरु स्तीला उशीर होत असल्याचे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.
पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबे हलवण्याची व्यवस्था करू, असे सांगितले. गॅमन चौक येथील दुरु स्तीदेखील तितकीच महत्त्वाची असल्यामुळे त्यावर यावेळी चर्चा झाली. यानुसार, २५ आॅगस्टपर्यंत ही दुरुस्ती पूर्ण झाली पाहिजे, असा दम पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना भरला.
>एफएम वाहिनीची
मदत घेणार
वाहतूककोंडीबाबत तक्रारींवर त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच वाहनधारक आणि नागरिकांना वाहतूककोंडी किंवा रस्तेदुरुस्तीची अद्ययावत माहिती मिळाली पाहिजे, अशी सूचना प्रवासी महासंघाचे मिलिंद बल्लाळ यांनी केली. यावर पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी एफएम रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून ठाणे आयुक्तालयातील वाहतूक नियंत्रण कक्ष हा सातत्याने अशी माहिती पुरवत राहील, अशी व्यवस्था करण्याचे मान्य केले.
>वाहतुकीवर नियंत्रण
भिवंडी येथील गोदामांच्या वाहतुकीस नियंत्रणात आणले व त्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली, तर बराच प्रश्न सुटेल, असे यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले. भिवंडीतील वाहनचालकांच्या संघटनांशी बोलून त्या भागातील वाहतूक नियंत्रित करावी तसेच अवजड व जड वाहनांचे वेळापत्रक निश्चित करावे, असे प्रांताधिकारी मोहन नळदकर यांनी स्पष्ट केले. उरण-जेएनपीटी तसेच पालघरकडून येणारी वाहनेदेखील नियंत्रित करण्याच्या सूचना होत्या. पत्रीपुलाच्या उंचीचे अडथळे थोडे अधिक उंच करण्यात यावेत, जेणेकरून टेम्पो वगैरेंसारखी वाहने जाऊ शकतील, अशी सूचना वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी केली.
>नोडल अधिकाºयांची नियुक्ती
जिल्ह्यातील वाहतूककोंडीबाबत सर्व संबंधित यंत्रणांसमवेत समन्वय साधण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील समन्वय अधिकारी राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रश्न सोडवताना अडचणी आल्यास या दोघांशी यंत्रणांनी संपर्क साधावा, असे ते म्हणाले. प्रवासी संघटना, टॅक्सी संघटना, ओला-उबेर यांचा सहभाग असलेली वाहतूक सल्लागार समिती नेमण्याचे ठरवण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांचे स्पष्ट केले.
>१०० वाहतूक वॉर्डन
वाहतूककोंडी दूर करण्यासाठी खड्डे बुजवणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्व ठिकाणी किमान मध्यरात्रीच्या वेळी पालिकांनी ते बुजवण्याची प्रक्रिया प्राधान्याने करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सध्या पोलिसांना मदतीसाठी दिलेले वाहतूक वॉर्डन अपुरे असून १०० वॉर्डन एमएसआरडीसीने द्यावेत, असेही ते म्हणाले. वाहतूककोंडीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना, वाहनधारकांना मोठा फटका बसत असून सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून या प्रश्नाकडे पाहावे व लोकांची गैरसोय होणार नाही, असे पाहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.